अमर्याद अधिकार देणारा वक्फ कायदा रद्द करण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी
चिपळूण : वक्फ बोर्डाला देशातील भूमी बळकाविण्याचे अमर्याद अधिकार देणारा वक्फ कायदा रद्द करा, अशी मागणी करण्यासाठी शनिवारी (दि.22) चिपळूण येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्याकडे हिंदू जनजागृती समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे सुरेश शिंदे, संतोष घोरपडे, अविनाश आंब्रे, विहिंपचे उदय चितळे, पराग ओक, निहार कोवळके, संदीप कदम, विक्रम जोशी, वैभव शिंदे आदींची उपस्थिती होती. या निवेदनानुसार, स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारने वक्फ कायद्यात वेळोवेळी सुधारणा करून त्यांना जास्तीचे अधिकार दिले. 1995 आणि 2013 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने या कायद्यात केवळ मुस्लीम नव्हे तर हिंदू, शिख, बौद्ध, ख्रिस्ती अशा सर्व धर्मियांची कोणतीही संपत्ती ही वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषित करण्याचे अधिकार बोर्डाला दिले. याचा दुरूपयोग करून देशात ‘लॅण्ड जिहाद’ केला जात आहे. हे असेच चालू राहिले तर देशातील मोठा भूभाग गिळंकृत करण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे वक्फ कायदा रद्द करावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे.