शाळा बंद केल्यास अडीच हजार शिक्षक होणार अतिरिक्त
रत्नागिरी : राज्य शासनाने 20 हून कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने दुर्गम भागातील शिक्षण व्यवस्था कोलमडण्याची भीती असून, राज्याच्या कानाकोपर्यातील वाड्यावस्त्यांवरील मुलांना या निर्णयाचे परिणाम भोगावे लागणार आहेत. जिल्ह्यातील 2 हजार 446 शाळांपैकी 1345 शाळा बंद होणार असल्याने त्यातील जवळपास अडीच हजार शिक्षकांचे काय करणार? हा प्रश्न समोर आला आहे. यामुळे गुरूजी टेन्शनखाली आले आहेत.
या शाळा बंद निर्णयाचा मोठा फटका जिल्ह्याला बसणार आहे. यापूर्वी 28 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सध्या जिल्हा परिषदेच्या 1 ते 8 वीच्या 2 हजार 446 शाळांमध्ये 72 हजाराहून अधिक विद्यार्थी आहेत. गुणवत्ता असली तरीही अनेक शाळांचा पटही कमी होत आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील शून्य ते वीस पटापर्यंच्या एकूण 1 हजार 345 शाळा आहेत. 0 ते 5 पटाच्या 249 शाळा, 6 ते 10 पटाच्या 420 शाळा, 11 ते 15 पटाच्या 392 शाळा, 16 ते 20 पटाच्या 285 शाळा आहेत. वीसपेक्षा अधिक पट असलेल्या जिल्ह्यात 1 हजार 145 शाळा आहेत. शासनाच्या निकषानुसार एक ते साठ पटसंख्येला दोन शिक्षक आहेत. यामुळे जवळपास अडीच हजार शिक्षक या शांळामध्ये शिकवत आहेत. या शिक्षकांचे समायोजन किंवा त्यांचे पुढे काय करणार याबाबत संभ्रम आहे.