लांजातील प्रलंबित देवधे ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर
लांजा : तालुक्यातील देवधे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा तात्पुरता स्थगित करण्यात आलेला निकाल तहसीलदार प्रमोद कदम यांनी गुरुवार दि. 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता जाहीर केला. यामध्ये राजाराम लुकाजी हरमले यांना विजयी घोषित करण्यात आले. देवधे निकालामुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पारड्यात आणखी एका ग्रामपंचायतीची भर पडली आहे.
ईव्हीएम मशीनमधील तांत्रिक बिघाड झाल्यानेच दहा मतांचा फरक पडला होता. मशीनवरील एंड बटन मतदारांनी चुकून दाबले गेले असल्याने देखील हा फरक पडू शकतो, असा प्राथमिक निष्कर्ष पुढे आला होता. या बटणावरील पांढरी फित मशीनवर लावली गेली नसल्याची बाब पुढे आली होती. दरम्यान निकालाच्या दिवशी प्रत्यक्ष या निकालावरून आक्षेप घेतला गेल्याने गोंधळ उडाला होता. तहसीलदार प्रमोद कदम यांनी या निकालाबाबतचे मार्गदर्शन राज्य निवडणूक आयोगाकडे मागितले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी हा निर्णय जाहीर केला. त्यांच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोग प्रत्यक्ष उमेदवाराला मिळालेल्या मतांची आकडेवारी निश्चित करून विजयी उमेदवार घोषित करण्यात आला. शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झालेला असतानाही तो निर्णय निवडणूक यंत्रणा घोषित करीत नसल्याने नाराजी व्यक्त झाली होती. दहा मतांचा फरक कशामुळे पडला आहे ही बाबच अनाकलनीय राहिल्याने ही तांत्रिक बाब निर्माण झाली होती. आ. राजन साळवी हे देखील चार तास याठिकाणी या गोष्टीसाठी ठिय्या मांडून बसले होते. मात्र, हा निकाल तात्पुरता स्थगीत करण्यात आला होता.
तालुक्यातील सर्वात लक्षवेधी आणि महत्त्वाची असलेली देवधे ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. यामध्ये अटीतटीच्या झालेल्या लढतीत भाजप प्रणित अजय गुरव यांनी शिवसेनेच्या राजाराम हरमले यांना जोरदार लढत दिली. शिवसेना उमेदवार हरमले आणि भाजपचे अजय गुरव यांच्यात अवघ्या दहा मतांचा फरक पडला होता. मतदान यंत्रातील एकूण आकडेवारी यामध्ये 10 मतांचा फरक कशामुळे पडला हे शेवटपर्यंत निश्चित झालेले नाही. यामुळे तहसीलदार प्रमोद कदम यांनाही यावर निश्चित निर्णय घेता येत नसल्याचे निकालाच्या दिवशी सांगितले. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत मार्गदर्शन मागवण्यात आले
होते.
निवडणूक आयोगाने गुरुवारी हा निकाल आदेशान्वये घोषित केला. त्यानुसार तहसीलदार प्रमोद कदम यांनी देवधे ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे सर्व उमेदवारांना तहसील कार्यालयात पाचारण करून हा निर्णय जाहीर केला. यामध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेचे राजाराम हरमले दहा मताने निवडून आले त्यांनी भाजपच्या अजय गुरव यांचा निसटता पराभव केला.