
आता शिक्षक बनण्याचा ओढा कमी झाला, डी.एड. महाविद्यालये अडचणीत
रत्नागिरी: वेगवेगळ्या महाविद्यालयात व सरकारी ठिकाणी डी.एड. केले की हमखास नोकरी हे काही वर्षापूर्वी सुरळीत चाललेले गणित आता बिघडले असून डी.एड. अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असून हे अभ्यासक्रम शिकविणार्या महाविद्यालयात अनेक जागा रिक्त पडल्या आहेत. त्यामुळे भावी काळात शिक्षक बनण्यास कोणी उत्सुक नसल्याचे चित्र आता दिसत आहे. पुर्वीच्या काळात डी.एड.ची परीक्षा दिली की तात्काळ शिक्षकाची नोकरी मिळत होती. शिक्षकाची नोकरी मिळाली की हमखास आर्थिक स्थैर्य मिळत होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी बारावी परीक्षा झाल्यानंतर डी.एड.कडे प्रवेश घेण्याला गर्दी करत होते. परंतु आता त्यामध्ये आता बदल झाला आहे. डी.एड.ची परीक्षा दिल्यानंतर शिक्षक भरतीसाठी नवीन टीईटी परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अतिशय अल्प असल्याने शिक्षकाची नोकरी मिळू शकत नाही. यामुळे नुसता डी.एड. करून काहीच उपयोग होत नसल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. काही वर्षापूर्वी डी.एड.कडे विद्यार्थ्यांचा वाढलेला ओढा पाहून जिल्ह्यात अनुदानित व विनाअनुदानित अशी महाविद्यालये निघाली होती. मात्र त्यातील काही विनाअनुदानित महाविद्यालये आता विद्यार्थ्यांच्या संख्येअभावी बंद पडली आहेत. विना अनुदानित महाविद्यालयाची क्षमता ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची असून केवळ ८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यामुळे ही महाविद्यालयेही अडचणीत आली आहेत.