नाणीज येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचा जन्मोत्सव
नाणीज : महाराष्ट्राचा ठेवा असलेल्या लोकसंस्कृतीचा सुंदरगडावर जागर व देशभरातील प्रमुख संतमहंताकडून एकत्रितपणे केलेले जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे औक्षण, अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी नाणीज येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा झाला. दिवसभर सुरू असलेला वाद्यांचा गजर, जयघोष या सार्यांच्या सोबतीला जलधारांच्या वर्षावाने उत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला.
नाणीज परिसरात सतत पाऊस कोसळतो आहे. त्याची पर्वा न करता रात्रभर, अगदी सकाळपर्यंत भाविक जथ्याने या उत्सवाचे साक्षिदार होण्यासाठी येत होते. जगद्गुरू श्रींचे शुक्रवारी सकाळी सुंदरगडावर आगमन झाले. सर्व देवदेवतांचे दर्शन घेऊन ते संतपीठावर आले. देशाच्या विविध राज्यातील आखाड्यांचे व मठांचे प्रमुख संतमहंत या सोहळ्यात सहभागी झाले होते. सारे संतपीठावर स्थानापन्न होते. त्यांची प्रवचने झाली. काहींनी जगद्गुरू श्रींच्यांवर पोवाडे सादर केले. पूजा, आरती नंतर सर्वांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे जन्मसोहळ्यानिमित्त औक्षण केले.
त्यानंतर संतपीठावर लोकसंस्कृतीचा सोहळा रंगला. त्याला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. सकाळी 10 पासून जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज चरण दर्शन सोहळा झाला. त्यानंतर उत्तर रायगड जिल्ह्याचे भजन झाले. दुपारी महा मृत्यूंजय सप्तचिरंजीव यागाची सांगता झाली. सर्व धार्मिक विधी नाशिकचे वे.शा.सं. भालचंद्र शास्त्री शौचे गुरूजी व त्यांच्या सहकार्यांनी केले. दरम्यान तरडगाव (ता. कर्जत, जि. अहमदनगर) व नाशिकहून निघालेल्या पायी दिंड्या आज श्रीक्षेत्री दाखल झाल्या आहेत. त्यांचे स्वागत संस्थानच्या तरडगावची पायी दिंडी 5 ऑक्टोबरला निघाली होती. दिंडीचे हे 26 वर्ष आहे. 450 किलो मीटरचा प्रवास आहे. त्यात 300 भाविक सहभागी होते. या दिंडीचे प्रमुख गणी अहमद सय्यद हे मुस्लिम समाजातील स्वामीजींचे निस्सिम शिष्य आहेत. तसेच दुसरी दिंडी नाशिकहून 30 सप्टेबरला निघाली होती. तिचा प्रवास 600 किलो मीटरचा आहे. त्यात 300 भाविक सहभागी झाले आहेत. त्यांचे हे 18 वे वर्ष आहे. सोहळ्यादिवशी त्यांचे सुंदरगडावर आगमन झाले. सुंदरगड येथे काल रात्रीपासून 24 तास महाप्रसाद सुरू झाला आहे. सर्व मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा आहेत. दरवर्षीप्रमाणे दोन दिवस येथील सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज रुग्णालयात आरोग्य शिबिर झाले.