
चिपळुणात आ. भास्कर जाधवांचे कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत
चिपळूण : शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांच्या समर्थकांनी चिपळुणात जंगी स्वागत केले. येथील रेल्वे स्थानकावर त्यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी घोषणा देत शक्ती प्रदर्शन केले.
त्यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणानंतर आ. जाधव प्रथमच शुक्रवारी (दि.21) सांयकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास चिपळूण रेल्वे स्थानकात आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी चिपळूण व परिसरातील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. उपजिल्हाप्रमुख प्रताप शिंदे, तालुकाप्रमुख संदीप सावंत, विनोद झगडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, यतीन कानडे, माजी जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव, फैसल कास्कर तसेच मोठ्या प्रमाणावर शिवसेना कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर स्वागतासाठी हजर होते. आ. जाधव यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली व त्यांना खांद्यावर घेत, ‘कोण आला रे कोण आला.. शिवसेनेचा वाघ आला’ अशा घोषणा दिल्या. त्यानंतर सर्व कार्यकर्ते चिपळूण रेल्वे स्टेशन ते आ. जाधव यांच्या निवासस्थानी पोहोचले.
या संदर्भात बोलताना आ. जाधव म्हणाले, गेली चाळीस वर्षे आपण राजकारणात आहोत. सर्वजण मला अशीच साथ देतात असे सांगताना आ. जाधव यांना अश्रू अनावर झाले. ज्यावेळी चाळीस लोक शिवसेना सोडून गेले त्यावेळी भावनांचा कडेलोट झाला. सेना संपविण्याचा भाजपने प्रयत्न केला. परंतु सेना काही संपत नाही हे लक्षात आल्यावर चाळीस आमदार फोडले. त्यावेळी शिवसैनिक धुमसत होता. अशावेळी आपण शिवसैनिकांना साद घालण्याचा निर्णय घेतला. त्याचा हुंकार महाराष्ट्राला दाखवायचा त्यासाठी सुरुवात केली. मी घेतलेली भूमिका आता शिवसेना कार्यकर्त व सहकार्यांना मान्य आहे याचे समाधान वाटते, असे आ. जाधव म्हणाले.




