रत्नागिरी एमआयडीसी नजीक तरुणाची गळफासाने आत्महत्या
रत्नागिरी : मिरजोळे एमआयडीसी नजीकच्या साईभूमी नगर येथील एका बिल्डिंगमध्ये तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. शुक्रवारी सकाळी 9.30 वा. सुमारास ही घटना उघडकीस आली. साहिल विनायक मोरे (वय 24, राहणार अलावा मिर्या, रत्नागिरी) असे या तरुणाचे नाव आहे. साहिल एमआयडीसी येथे जॉबला होता. त्याचे एका फायनान्स कंपनीतील मुलीशी प्रेम होते. त्या दोघांमध्ये काही महिन्यांपूर्वी भांडण झालेले होते. शुक्रवारी तो आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी साईभूमी नगर येथील प्रेयसीच्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेला होता.
साहिलच्या प्रेयसीचे लग्न ठरल्यानंतर तिने साहिलला आपला विषय सोडायला सांगितले होते. शुक्रवारी सकाळी साहिल तिला भेटण्यासाठी साईभूमी नगर येथील तिच्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेला होता. काही वेळाने साहिलच्या प्रेयसीने मी कामावर जात असून तू दरवाजा बंद करुन खाली ये असे त्याला सांगितले. परंतु साहिल बिल्डिंगच्या खाली न आल्याने तिने जाऊन पाहिले असता तिला साहिल गळ्याला पट्टा लावून सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याच्या प्रेयसीने कात्रीने तो बेल्ट कापून साहिलला शेजार्यांच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.