दापोली नगर पंचायतीत लाखोंचा गैरव्यवहार; लेखापाल पोलिसांना शरण
दापोली : नगरपंचायतीत शासकीय निधीचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल असलेले तत्कालीन लेखापाल दीपक सावंत शुक्रवारी पोलिसांसमोर शरण आले असून त्यांना अटक करण्यात आली. शनिवारी त्यांना दापोली येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दापोली नगरपंचायतीचे लेखापाल सिद्धेश खामकर यांना नगरपंचायतीच्या विविध विकास योजनांच्या बँक खात्यांची स्टेटमेंट तपासत असताना त्यांना काही रकमा श्री एंटरप्रायझेस, मंगेश पवार, शंकर पवार या नावाने नगरपंचायतीच्या विविध खात्यात शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त १ कोटी ३० लाख २०८ इतकी रक्कम जमा झाल्याचे निदर्शनास आले. १४ सप्टेंबर रोजी खामकर यांनी हि बाब मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर खामकर यांनी श्री एंटरप्रयाझेस, मंगेश पवार, शंकर पवार यांच्या खात्यांची तपासणी केली असता त्यांनी नगरपंचायतीचे कोणतेही काम न करता त्यांना या रकमा अदा करण्यात आल्या असल्याचे समोर आले. या रकमा १ एप्रिल २१ ते ३१ मार्च २२ या कालावधीत अदा करण्यात आल्या होत्या. त्या कालावधीत दीपक सावंत हे लेखापाल होते. त्यामुळे दीपक सावंत यांना या संदर्भात खुलासा करावा असे पत्र देण्यात आले. मात्र सावंत यांनी कोणताही खुलासा केला नाही त्यामुळे त्यांना १६ सप्टेंबर रोजी निलंबित करण्यात आले व या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्री सदस्यीय समिती नेमण्यात आली. या समितीने १ एप्रिल २१ ते ३१ मार्च २२ या कालावधीतील आर्थिक लेखे तपासून अहवाल सादर केला. आर्थिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये नगरपंचायतिच्या विविध बँक खात्यामधून ५ कोटी ८१ लाख १० हजार ३०९ इतक्या रकमेचा अपहार करण्यात आला असून त्यापैकी १ कोटी ३० लाख ४९ हजार २०८ इतकी रक्कम पुन्हा खात्यात जमा करण्यात आली आहे. या प्रकरणी संशयित दीपक सावंत यांनी शासकीय निधीचा अपहार केल्याची तक्रार लेखापाल सिद्धेश खामकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीनुसार संशयित दीपक सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती या प्रकाराचे तपास अधिकारी तथा खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद यांनी दिली आहे.