संगमेश्वर-रांगव येथे गोठ्यात आढळले दोन बछडे; एक जिवंत तर दुसरा मृत
संगमेश्वर : तालुक्यातील रांगव धनगरवाडीतील शेतकर्याच्या गोठ्यात बुधवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दोन बछडे आढळून आले आहेत. याबाबत वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, धोंडू तुकाराम जांगली यांच्या मालकीच्या गोठ्यात दोन बछडे आढळल्याची माहिती जितेंद्र चव्हाण यांनी देवरूखचे वनपाल तौफिक मुल्ला यांना दिली. यानंतर तौफीक मुल्ला यांनी आपल्या सहकार्यांसमवेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यातील एक नर जातीचा बछडा अर्धवट खाल्लेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळून आला. पशुवैद्यकिय अधिकारी यांच्याकडून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. सुस्थितीत असलेल्या बछड्यास तिची आई घेऊन जाईल, या उद्देशाने त्याला नैसर्गिक अधिवासात ट्रॅप कॅमेरे लावून त्याला निगराणीखाली ठेवले जात आहे. हे ट्रॅप कॅमेरे लावण्यासाठी वन्यजीव रक्षक नीलेश बापट, वन्यजीव अभ्यासक प्रतीक मोरे व त्यांच्या टीमने मदत केली. ही कार्यवाही विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वन्यप्राणी मानवी वस्तीत आल्यास वा संकटात सापडल्यास वनविभागाच्या 1926 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांनी केले आहे.