दिवाळीत चक्रीवादळाच्या प्रभावाने कोकणात पावसाची शक्यता
रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत झाले आहे. त्याच्या प्रभावाने चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावाने कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. चक्रीवादळाचा थेट परिणाम राज्यावर पर्यायाने कोकण किनारी भागात होणार नसला तरी त्याच्या प्रभावाने जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटही होण्याचा अंदाज आहे. कोकणातील जिल्ह्यांना पाऊस अॅलर्ट जारी केला आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा प्रभाव राहणार आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुसळधार पावसाचा इशारा असताना विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच किनारी भागात सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.