
रत्नागिरी शहरात प्लास्टिक विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई
रत्नागिरी : शहरात प्लास्टिक बंदी संदर्भात कारवाई सुरू झाली आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पथकाकडून मंगळवारी सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्या दुकानदारांकडून 30 हजार रु. चा दंड वसूल करण्यात आला. स्वच्छता निरीक्षक संदेश कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
प्लास्टिक बंदी अधिनियम 2016 नुसार गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात अशीच दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यावसायिक रत्नागिरीत दाखल झाले आहेत. त्याचबरोबर दिवाळी खरेदीच्या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्या वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. त्यामुळे पुन्हा एकदा प्लास्टिक बंदी संदर्भात कारवाई सुरु करण्यात आली आहे.
रत्नागिरी शहरातील 15 पेक्षा अधिक दुकानांची आणि फेरीवाल्यांकडे तपासणी करण्यात आली. राम आळी ते गोखले नाका परिसरात सुमारे 7 किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या असून वापर करणार्या दुकानदारांकडून, फेरीवाल्यांकडून 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात
आला.