रत्नागिरी जिल्ह्यातील पोस्ट कार्यालयांची संख्या वाढली; पत्रपेट्या दिवसेंदिवस कमीकमी

रत्नागिरी : गेल्या 10 वर्षात जिल्ह्यातील 449 पत्रपेट्या कमी करण्यात आल्या आहेत. मात्र पोस्टांची संख्या वाढत आहे.ग्रामीण भागातील अनावश्यक पत्रपेट्या कमी होत असल्या तरी शहरात पत्रपेट्यांच्या संख्येत वाढ होत आहे. शहरात नवीन वसाहती, आस्थापना, उद्योगधंदे वाढू लागले आहेत. यासह शासकीय संस्थांचे पत्रव्यवहार पोस्टाद्वारे होत असल्याने शहरात पत्रपेट्या वाढवण्यात येत असल्याचे डाक विभागाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात सन 2009-10 मध्ये 2227 पत्रपेट्या होत्या. सन 2020-21 मध्ये ही संख्या 1778 वर आली आहे. यामध्ये मंडणगड तालुक्यात 10 वर्षांपूर्वी 139 पत्रपेट्या होत्या. त्या आता 77 वर आल्या आहेत. दापोलीत 258 होत्या त्या पत्रपेट्या 174 झाल्या आहेत. खेडमध्ये 258 पत्रपेट्या होत्या, त्या आता 179 झाल्या आहेत. चिपळुणात 10 वर्षांपूर्वी 293 असलेल्या पत्रपेट्या 292 वर पोहोचल्या आहेत. गुहागरात 136 पत्रपेट्या होत्या, त्या 114 आणि रत्नागिरीत 372 पत्रपेट्या होत्या त्या 167 वर आल्या आहेत. संगमेश्‍वरात 259 पत्रपेट्या 236 वर, लांजातील 182 पत्रपेट्या 178 झाल्या आहेत. तर राजापूर तालुक्यातील 330 पत्रपेट्या होत्या त्या आता 361 राहिल्या आहेत.
पत्रपेट्यांची संख्या कमी होत असली तरी पोस्टांची संख्या वाढती आहे. 10 वर्षांपूर्वी 656 पोस्टांची संख्या होती. ती आता 663 वर पोहोचली आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार या पोस्टांमध्ये सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे पोस्टांची सुविधा असलेल्या गावांची संख्याही गेल्या 10 वर्षात वाढली आहे. त्यानुसार 653 पोस्टांची सुविधा असलेल्या पोस्टांची संख्या 655 वर गेली आहे. जिल्ह्यातील पोस्टमन संख्याही गेल्या 10 वर्षात कमी होत गेली आहे. पूर्वी पोस्टमन सायकलच्या मदतीने सेवा देत होते. परंतु, आता दुचाकी किंवा मोटारसायकल आल्याने पोस्टमन सेवा जलद झाली आहे. 10 वर्षापूर्वी जिल्ह्यात 819 पोस्टमन संख्या होती ती आता 2020-21 मध्ये 751 इतकी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button