
बिबट्या शिकार प्रकरणाच्या तपासाला गती मिळेना
संगमेश्वर : तालुक्यातील कुळ्येवाशी येथील बिबट्या शिकार प्रकरणाचा तपास संगमेश्वर पोलिसांनी संथगतीने सुरु ठेवला आहे. हा तपास वनविभागाकडे देणे अपेक्षित होते. मात्र पोलिस हा तपास करत असताना आरोपी अद्याप मोकाटच आहेत.
विनापरवाना लाकूड वाहतूक केल्याबाबत पोलिस यंत्रणा वाहन चालकाला वाहनासकट ताब्यात घेऊन पुढील तपास वन विभागाकडे वर्ग करते. अशा प्रकारे पोलिस यंत्रणा वनविभागाच्या अखत्यारितील सर्व प्रकरणे वर्ग करतात. याचप्रमाणे संगमेश्वर पोलिसांचीही कार्यप्रणाली सुरू होती. आठ दिवसांपूर्वी विना परवाना खैराची वाहतूक करणार्यांना ताब्यात घेऊन पुढील तपास वनविभागाकडे वर्ग केला. असे असताना मात्र बिबट्या शिकार प्रकरण वनविभागाकडे वर्ग न केल्याने संगमेश्वर पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच तालुक्यातून शंका व्यक्त होत आहेत.