गवा रेड्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या माचाळ येथील शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
लांजा : गवा रेड्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लांजा तालुक्यातील माचाळ येथील शेतकर्याचा जिल्हा शासकीय रुग्णालय येथे मंगळवारी 18 रोजी सायंकाळी मृत्यू झाला आहे. भिकाजी राघू मांडवकर असे त्यांचे नाव आहे.
मांडवकर हे रविवारी 9 ऑक्टोबर रोजी आपल्या शेतात काम करत असताना दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जंगली गवा रेड्याने त्यांच्यावर हल्ला चढविला होता. यामध्ये ते गंभीर जखमी होऊन त्यांची आतडी बाहेर आली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालय आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी 9 ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर होती.
या दरम्यान राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, लांजा – राजापूरचे आमदार राजन साळवी तसेच विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देऊन भिकाजी मांडवकर यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी अचानक मांडवकर यांची तब्येत बिघडली. त्यानंतर पुन्हा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, मंगळवारी सायंकाळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.