आ. भास्कर जाधव समर्थकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या; फिर्यादीनंतर अज्ञातावर गुन्हा दाखल
चिपळूण : शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर मंगळवारी (दि.18) रोजी मध्यरात्री हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकारानंतर आ. जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना घेराव घालत पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला. यातील संशयितांना तत्काळ अटक करा, संबंधितांवर गुन्हे दाखल करा अशीही मागणी केली.
घरासमोर दगड, पेट्रोल भरलेल्या बॉटल्स आणि स्टम्प आढळून आले आहेत. त्यामुळे संशयितांनी घर जाळण्याचा व गाड्या फोडण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप आ. जाधव समर्थकांनी पोलिस ठाण्यात केला. शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, संदीप सावंत, शौकत मुकादम, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, माजी जि. प. सदस्य दिशा दाभोळकर, पप्या चव्हाण व पदाधिकारी, कार्यकर्ते पोलिस ठाण्यावर धडकले. यानंतर समीर भास्कर जाधव यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.