मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात कंटेनरची तीन वाहनांना धडक सुदैवाने मनुष्यहानी नाही ; कंटेनर चालकासह दोघेजण जखमी
खेड : मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अपघातांची मालिका थांबता थांबत नाही. आज घाट उतरणाऱ्या भरधाव वेगातील कंटेनरने एसटी बस, दुचाकी आणि युटिलिटी व्हॅनला धडक दिल्यानंतर नियंत्रण हरवून बसलेला कंटेनर अवघड वळणात पलटी झाला. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात कंटेनर चालक आणि युटिलिटी व्हॅनचा चालक जखमी झाला आहे. दुचाकीस्वाराने दैव बलवत्तर म्हणून तो या अपघातातुन केवळ खरचटण्यावर बचावला. या अपघातात महेंद्र यूटिलिटीला कंटेनरची बसलेली धडक एवढी जोरात होती कि युटिलिटी व्हॅन रस्ता दुभाजाकावरूनउडून विरुद्ध दिशेला गेली.
महामार्ग चौपदरीकरणादरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणाचे काम योग्य प्रकारे न झाल्याने चौपदरीकरण झाल्यापासून भोस्ते घाटातील त्या अवघड वळणावर दर दोन दिवसांआड जीवघेणे अपघात होऊ लागले आहेत. यामध्ये एका ट्रक चालकाचा बळी गेला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. या अवघड वाळणवर वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत महामार्ग बांधकाम विभागावर माध्यमातून टीका होऊ लागल्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथे गतिरोधक बसविण्याच्या निर्णय घेतला. गतिरोधकामुळे वाहनांचा वेग कमी होईल आणि अपघातांना आळा बसेल असे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वाटले होते मात्र गतिरोधक बसवलेल्या ठिकाणी सूचना फलक किंवा पांढरे पट्टे मारण्याची तसदी न घेतल्याने गतिरोधकामुळे अपघातांना आळा बसण्याऐवजी अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
आज झालेला अपघात हा देखील गतिरोधकामुळेच झाला आहे. गोवा दिशेकडून मुंबई दिशेकडे जाणारा कंटेनर भोस्ते घाट उतरत असताना अचानक स्पीड ब्रेकर आल्याने चालकाने कंटेनरला ब्रेक केला मात्र त्यामुळे या कंटेनरची उजव्या बाजूने जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला धडक बसली. एसटीला वाचविण्यासाठी चालकाने कंटेनर डाव्या बाजूला घेतला मात्र त्याच वेळी डाव्या बाजूला असलेल्या दुचाकीस्वाराला धडक बसली. या दोन वाहनांना धडक दिल्याने नियंत्रण हरवून बसलेल्या चालकाने कंटेनरच्या पुढे असलेल्या महेंद्र युटिलिटी व्हॅनला मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती कि युटिलिटी व्हॅन रास्ता दुभाजकावरून उडवून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गेली. या अपघातात युटिलिटी व्हॅन चालक जखमी झाला.
युटिलिटी व्हॅनला धडक दिल्यानंतर त्याच वेगाने पुढे आलेला कंटेनर अवघड वळणावर संरक्षक भिंतीला धडकुन थांबला. या अपघातात कंटेनरचालक देखील जखमी झाला. ५०० मीटरच्या अंतरात तीन वाहनांना धडक देऊन पलटी झालेल्या कंटेनरच्या चालक नशेत असावा अशी चर्चा अपघातस्थळी सुरु होती. जर तो नशेत नसता तर स्पीड ब्रेकर वर एसटीला धडक दिल्यावरच तो थांबला असता असा अनुमान काढला जात आहे.
या अपघातात जखमी झालेल्या दोघांनाही कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्यावर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहतूक शाखेचे पोलीस उप निरीक्षक अनिल चांदणे हे अपघातस्थळी आल्यावर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
मुंबई गोवा महामार्गाला दर दोन दिवस आड होणाऱ्या अपघातांना आळा बसावा या उद्देशाने करोडो रुपये खर्च करून मुंबई गोवा महामार्गच्या चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर अपघातांना आळा बसेल अशी अपेक्षा होती मात्र भोस्ते घाटात अपघातांना आळा बसण्याऐवजी घाटात अपघातांची संख्या वाढू लागल्याने मुंबई गोवा महामार्गाचे खेड तालुक्याच्या हद्दीतील चौपदरीकरण महामार्गावरील प्रवाशी आणि चालकांसाठी शाप कि वरदान असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.