राजापूर तालुक्यातील दहापैकी नऊ ग्रामपंचायतींवर भगवा फडकल्याचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा दावा
राजापूर : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले होते, त्याचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने बाजी मारत पाचही ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला. थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत भालावलीतून भाजपाने सेना उमेदवाराचा 24 मतांनी पराभव केला. दहापैकी पाच ग्रामपंचायती यापूर्वी बिनविरोध झाल्या होत्या. तालुक्यातील दहापैकी नऊ ग्रामपंचायतींवर भगवा फडकल्याचा दावा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. विजयानंतर शिवसेनेकडून घोषणाबाजी करण्यात आली. सेनेचे उपनेते व आमदार राजन साळवींच्या उपस्थितीत सेनेकडून जल्लोष साजरा करण्यात आला.
थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाच पैकी चार सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान तालुक्यातील दहापैकी नऊ ग्रामपंचायतीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा भगवा फडकल्याचा दावा सेनेकडून करण्यात आला.
राजापूर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यामध्ये केळवली ,मूर ,देवाचेगोठणे ,मोगरे ,वडदहसोळ यांचा सामावेश होता. तर सागवे, आंगले ,भालावली ,राजवाडी आणि कोंड्ये तर्फे सौंदळ अशा पाच ग्रामपंचायतींमध्ये रविवारी (16 ऑक्टोबर) रोजी मतदान पार पडले होते. सोमवारी राजापूर पंचायत समितीच्या किसान सभागृहात मतमोजणी पार पडली .
सागवे ग्रामपंचायतीमध्ये चुरस होती. एकूण पंधरा सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेने नऊ जागा जिंकून सत्ता राखली तर काँग्रेसने सहा जागा जिंकल्या. अन्य पक्षांना खातेदेखील उघडता आले नाही. सागवेच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. यामध्ये शिवसेनेकडून सोनाली ठुकरूल आणि काँग्रेसकडून फिरोजा बोरकर यांच्यात लढत झाली. यामध्ये सोनाली ठुकरूल यांनी बाजी मारीत विजय संपादन केला व सेनेला यश मिळवून दिले.
आंगले ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरपंचपदाचे उमेदवार श्रीधर सौंदळकर हे विजयी झाले. त्यांनी संतोष सौंदळकर यांचा पराभव केला. अन्य विजयी सदस्यांमध्ये दत्तात्रय राऊत, वासुदेव गराटे, विजय राऊत, संस्कृती सौंदळकर, सदस्य गौतमी जाधव, प्रगती राऊत यांचा सामावेश असून सेजल पांचाळ यापूर्वी बिनविरोध निवडून आल्या आहेत.
सागवेमधून मसुद शेख, मरयमरी बोरकर, रजीया बगदादी, मधुकर जोशी, संदेश बोटले, साक्षी मांजरेकर, कृष्णकांत मोंडे, योगिता नाकटे, निलाक्षी येरम, मंगेश गुरव, संपदा नार्वेकर, अनुष्का राणे, अब्दुल बोरकर, जुन्नेद मुल्ला, परवीन बोरकर यांचा विजयी उमेदवारांत समावेश आहे.
कोंड्येतर्फे सौंदळ ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. येथे शिवसेना विरूध्द भाजप अशी रंगत निर्माण झाली होती. सरपंचपदाच्या निवडणुकीसह शिवसेनेने सहा जागा जिंकून ग्रामपंचायतीवरील सत्ता कायम ठेवली. लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीत सेनेच्या मिनल तळवडेकर यांनी विजय मिळवताना सरपंचपदाचे विरोधी उमेदवार प्रणाली शिवगण यांचा पराभव केला. कोंड्ये ग्रामपंचायतीमध्ये विजयी झालेल्या सदस्यांमध्ये सदस्य विजय आगटे, हेमंत उपळकर, महेश कारेकर (बिनविरोध), विजया तळवडेकर, समीक्षा शिवगण, प्रतीक्षा घाणेकर (बिनविरोध), साक्षी हर्डीकर, प्रतीक्षा भाताडे, संतोष टक्के यांचा समावेश आहे.
राजवाडी ग्रामपंचायतींच्या सातपैकी पाच जागा यापूर्वी बिनविरोध ठरल्या होत्या. मात्र अन्य दोन जागांसह लोकनियुक्त सरपंच पदासाठी मतदान झाले होते. त्यामध्ये अजित बंडबे यांनी नंदकुमार हळदणकर यांचा पराभव केला व ते सरपंचपदी विजयी झाले. दोन जागांसाठी झालेल्या मतदानात किरण बंडबे आणि सुनील वाघरे निवडून आले.