लांजात ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान
लांजा : रविवारी १६ ऑक्टोबर रोजी लांजा तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींपैकी १३ ग्रामपंचायतींची सरपंचपदे आणि ८६ सदस्यांसाठी मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यानंतर कोचरी आणि शिरवली या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे रविवारी १६ ऑक्टोबर रोजी १३ सरपंच पदांसाठी मतदान होणार असून त्यासाठी ३३ उमेदवार रिंगणात आहेत. याबरोबरच ग्रामपंचायत सदस्यपदाचा १२१ जागांपैकी २७ सदस्य बिनविरोध झाले असून काही ठिकाणी जागा रिक्त राहिलेल्या आहेत. त्यामुळे आता ८५ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी १८२ उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी लांजा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. ग्रामपंचायतीच्या एकूण ३९ केंद्र आणि प्रभागांसाठी ३९ केंद्राध्यक्ष, १,२,३ क्रमांकाचे मतदान अधिकारी याप्रमाणे एकूण ११७ मतदान अधिकारी, ३९ पोलीस कर्मचारी, शिपाई ३९, राखीव १६ कर्मचारी आणि १३ निवडणूक निर्णय अधिकारी याप्रमाणे सज्ज सज्ज झाले आहेत. रविवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून सोमवारी १७ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय लांजा येथे सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे.