खेड तालुक्यात लहान मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; दोन संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात
खेड : पैशाच्या आमिषापोटी मूल पळवून नेण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. गुणदे येथे आलेल्या एका संशयिताला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी दि.१५ रोजी ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगाराव शिवराम चव्हाण हे आवाशी – गुणदे येथे लोहारकाम करतात. या ठिकाणी ते झोपडी बांधून राहतात. शुक्रवारी दि. १४ रोजी रात्री ते झोपले असता एक अनोळखी इसम येऊन त्यांच्या झोपडीबाहेरील दिवे विझवून घरात शिरण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्यांच्या बहिणीला कुणीतरी झोपडीत शिरल्याची चाहूल लागली. त्यांनी आरडा-ओरडा करताच शेजारी खाटेवर झोपलेले रंगाराव जागे झाले आणि त्यांनी त्या अनोळखी इसमाला पकडले. आरडाओरडा झाल्यानंतर शेजारील झोपडीत पत्नी व दोन वर्षाच्या मुलासह झोपलेला त्यांचा मुलगा सचिन तेथे आला. त्याने संशयित इसमाकडे चौकशी केली. यावेळी त्याने आपल्याला एका इसमाने पन्नास हजार देण्याच्या बदल्यात मूल चोरण्यासाठी पाठविले असल्याचे सांगितले. मूल नेऊन दिल्यावर वीस हजार व मूल विकून झाल्यावर तीस हजार तो आपल्याला देणार असल्याचे सांगितले त्याने सांगितले. घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी या प्रकाराचा व्हिडीओ केला. ही माहिती शनिवारी दि.१५ रोजी पहाटे चव्हाण कुटुंबाने आवाशी सरपंच व उपसरपंच यांना दिली . त्यांनी घटनास्थळी पोहोचून खात्री केली व पोलिसांना माहिती दिली. पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. यावेळी तेथे ग्रामस्थ जमा झाले होते. संशयिताने आपण मूल चोरण्याचाच प्रयत्न केला असल्याचे पोलिसांना सांगितले. याबाबत चव्हाण यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्या अनोळखी इसमाचे नाव छोटूलाल अमरनाथ भारती (मूळ राहणार बनारस- उत्तर प्रदेश , सध्या रा . आवाशी) असे आहे. याच्याविरोधात अपहरणाचा प्रयत्न, चोरीच्या इराद्याने घरात घुसणे आदी विषयाच्या अनुषंगाने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खेड येथील अन्य एक संशयित कृष्णा नामक इसमाला या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील मुख्य सूत्रधाराचा शोध पोलिस घेत असल्याची माहिती लोटे पोलीस दूरक्षेत्राचे अधिकारी यु . एस . भोसले यांनी दिली.