’92 लाख हडप’ प्रकरणी लांजातील बँक ऑफ इंडियाला व्यापारी संघटनेचे निवेदन
लांजा : शहरातील यश कंस्ट्रक्शन या ठेकेदारी फर्मच्या बँक ऑफ इंडिया लांजा शाखेतील खात्यातून बँकेची सिस्टम हॅक करून परस्पर पैसे लंपास करण्याच्या नुकत्याच घडलेल्या सायबर क्राईम घटनेच्या पार्श्वभूमीवर लांजा तालुका व्यापारी संघटनेच्यावतीने बँकेला, खातेदारांच्या सुरक्षितते संदर्भात निवेदन देण्यात आले. लांजा तालुका व्यापारी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लांजा शहरातील व तालुक्यातील बहुसंख्य व्यापारी बँक ऑफ इंडिया या अग्रणी बँकेचे खातेदार तसेच कर्जदारही आहेत. सायबर गुन्हेगारांमार्फत यश कंस्ट्रक्शन फर्मच्या सुधीर भिंगार्डे यांच्या सीसी बँक खात्यातील ९२ लाख ५० हजार रूपयांची रक्कम सायबर गुन्हेगारांमार्फत ऑनलाइन फसवणूक करून लंपास करण्यात आली. भिंगार्डे यांनी आपल्या खात्यासंबंधी कोणतीही गुप्त माहीती दिली नसताना देखील त्यांची सायबर गुन्हेगारांमार्फत फसवणूक झाली असून हडप केलेली रक्कम पूर्ववत मिळेपर्यंत त्यांना बँकेकडून व्याजाची आकारणी करण्यात येऊ नये. तसेच सदरच्या फसवणूक झालेल्या रकमेबाबत सर्वस्वी जबाबदारी बँकेने घ्यावी. ऑनलाइन फसवणुकीची भीती शहरातील सर्व व्यापाऱ्यांना झालेली असून बँकेबाबत संशय निर्माण झाला आहे. या संदर्भात आपल्या विभागीय प्रशासन अधिकाऱ्यांनी व्यापारी खातेदारांशी तत्काळ संयुक्त बैठक घेण्याची विनंती व्यापारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.