वाटूळ येथील शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा
रत्नागिरी : शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये मुंबई- गोवा महामार्गावरील वाटूळ येथे शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होण्याच्या आमदार डॉ. राजन साळवी यांच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
पंचक्रोशी ग्रामविकास समितीने केलेल्या मागणीनुसार मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यात राज्य शासनाचे सुपर मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल व्हावे यासाठी आमदार डॉ. राजन साळवी यांनी सातत्याने तत्कालीन आरोग्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे अनेक वेळा प्रयत्न केले. त्यानुषंगाने वाटूळ येथे सुपर मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलसाठी ५ एकर जागा देण्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या निर्णयामुळे सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय होण्याची आशा निर्माण झाली होती.
परंतु प्रत्येक विभागामध्ये एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मंजुरी मिळत असून त्या अनुषंगाने कोकण विभागामध्ये यापूर्वी ठाणे जिल्ह्यात मंजुरी मिळाली असल्याने त्याऐवजी वाटूळ येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होण्याच्या अनुषंगाने सूचित केले होते. त्या अनुषंगाने मौजे वाटूळ येथे सदर जागेत १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होण्यासाठी सुधारित प्रस्ताव उपसंचालक, आरोग्य सेवा कोल्हापूर यांना सदर केला असून त्यानुसार मुख्य अभियंता,सा.बां.प्रादेशिक विभाग, कोकण यांचे कार्यालयाकडून त्याच्या बांधकामाकरिता रु.६२,८७,३०,१५६/- इतके अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध होणेकरिता दि.०२.०५.२०२२ अन्वये उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर यांच्याकडे सादर करण्यात आलेले आहे.