संगमेश्वरजवळ बिबट्याची शिकार! पोलिस ठाण्यात आलेल्या निनावी पत्राने बिंग फुटले, आरोपी अद्याप मोकाट?

बिबट्याची शिकार करून त्याची नखे व कातडे गायब करण्याचा प्रकार संगमेश्वर तालुक्यातील एका गावात घडला आहे. हा प्रकार घडून पंधरा दिवसांचा कालावधी उलटला आहे. तरीही आरोपी मोकाट असून वनविभाग व पोलिस यंत्रणा गप्प बसली असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. नवरात्रीपूर्वी हा प्रकार घडला आहे. बिबट्याची शिकार गावाजवळील जंगलात झाली. गावातीलच पाच ते सहा जणांनी हे कृत्य केले. बिबट्याची शिकार करून त्याची नखे व कातडे काढून उर्वरित अवयवांची विल्हेवाट लावण्यात आली.हा विषय चर्चेतून संपूर्ण गावात झाला. याबाबत गावची छुपी बैठक देखील पार पडली. यात हा विषय गावाच्या बाहेर जाता कामा नये, अशा शपथा घेण्यात आल्या. बैठकीतून या बिबट्या शिकार प्रकरणावर पडदा टाकण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे. कोणीतरी अज्ञाताने संगमेश्वर पोलिस ठाण्यात पोस्टकार्डद्वारे ‘बिबट्याची शिकार झाली आहे. यावर पोलिस यंत्रणेने कारवाई करावी,’ अशी मागणी केली.उघडे पत्र मिळताच संगमेश्वर पोलिस यंत्रणेकडून कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली. यात गावात चौकशी सुरू करून पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यातील तीन जणांना पहिल्याच तपासात सोडून देण्यात आले. यानंतर मुख्य संशयित आरोपींना पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. यावर संशयितांनी बिबट्याच्या शिकारीची कबुली दिल्याचे समजते. या संशयितांनाही पाच ते सहा दिवसांनी पोलिसांनी सोडून दिले, अशी चर्चा सुरू आहे. पुढे कोणतीच गुन्ह्याची कार्यवाही वा न्यायालयात हजर करणे अशा प्रकारची कारवाई झाली नाही. यामुळे हे प्रकरण कसे काय दडपलेे गेले? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. बिबट्याची नखे व कातडे याचेही काय झाले? याचेही गुपित उलगडत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button