शिरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ना. सामंत-आ. साळवींमध्ये रंगणार सामना
रत्नागिरी : शिरगाव ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील मोठी आणि सुमारे तीन कोटी रुपये उत्पन्न असणारी ग्रा.पं. आहे. त्यामुळे येथे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण सहयोगी गावपॅनल आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनाप्रणित महाविकास आघाडीमध्ये सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ही ग्रा.पं. ताब्यात मिळवण्यासाठी दोन्ही शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एका बाजूने रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत तर दुसर्या बाजूने आ. राजन साळवी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, राजन सुर्वे, सुदेश मयेकर जोमाने प्रचार कार्यात गुंतले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत विरूद्ध आमदार राजन साळवी असा सामना या निवडणुकीत रंगू लागला आहे.
शिरगावमधील सर्व प्रभागांचा विकास साधणारा आराखडा तयार केला जाईल. यापुढे या गावाला निधी अपुरा पडू देणार नाही, गावच्या विकासासाठी स्वतंत्र पॅकेज मिळवून देणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रचार सभेत दिली. संपूर्ण सहयोगी गाव विकास पॅनलच्या या जाहीर सभेत प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मधील उमेदवार अल्ताफ संगमेश्वरी यांनी यापूर्वी ना. सामंत यांच्या प्रयत्नातून शिरगावात कोणकोणती विकास कामे झाली याची माहिती दिली.
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संपूर्ण सहयोगी गाव विकास पॅनल उमेदवारांच्या प्रचाराची सभा शिरगाव येथे घेतली. यावेळी शिरगावच्या विकासासाठी घसघशीत निधी मिळवून देणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. सहयोगी गावपॅनलच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या सभेवेळी जिल्हाप्रमुख राहूल पंडित, माजी जि. प. सभापती महेश म्हाप, सरपंच पदाच्या उमेदवार साक्षी कुमठेकर, माजी उपसरपंच तथा उमेदवार अल्ताफ संगमेश्वरी व इतर उमेदवार उपस्थित होते. यावेळी माजी उपसरपंच तथा प्रभाग 1 व 2 चे उमेदवार अल्ताफ संगमेश्वरी यांनी ना. सामंत यांच्या माध्यमातून यापूर्वी रस्ते, गटारे, साकव, पाणी योजना, पथदीप अशी अनेक कामे झाली असल्याचे सांगितले. विरोधकांकडे विकासाचे मुद्देच नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून वय्यक्तिक पातळीवर आरोप केले जात आहेत. मात्र आम्ही पायाभूत सुविधांचा विकास भक्कम करण्यावर भर देत असल्याचे माजी सरपंच तथा उमेदवार संगमेश्वरी यांनी बोलताना सांगितले. शिरगावचा आता संपूर्ण विकास साधायचा आहे. असलेल्या सत्तेतून विकासगंगा आणण्यासाठी मतदारांनी मोठ्या संख्येने संपूर्ण सहयोगी गाव विकास पॅनलला पाठिंबा द्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी या जाहीर सभेतून केले. उद्यमनगर येथून शहराला जोडणारा रस्ता करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ना. सामंत यांनी
सांगितले.
शिरगाव ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडी पुरस्कृत गावपॅनलची सत्ता आणून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची ताकद दाखवून द्या. शिरगाव ग्रा.पं.वर गावपॅनलची सत्ता आल्यानंतर स्वच्छ आणि पारदर्शक कारभार दिला जाईल, असे आश्वासन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आ. राजन साळवी यांनी जाहीर सभेत दिले. या गावपॅनलचे नेते माजी सरपंच रज्जाक काझी यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांची माहिती दिली. महाविकास आघाडी पुरस्कृत गावपॅनलची मंगळवारी शिरगाव मोहल्ल्यातून प्रचार सभा काढण्यात आली. एकंदरित या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
शिरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान 16 ऑक्टोबर रोजी होणार असून बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पुरस्कृत पॅनलमध्ये जोरदार लढत होणार आहे. बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत संपूर्ण सहयोगी गाव पॅनलचे उमेदवार आणि महाविकास आघाडी पुरस्कृत गावपॅनल उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. दोन्ही बाजूने घरोघरी जाऊन प्रचार केला जात आहे.