लांजातील ‘92 लाख हडप’ प्रकरणाचा तपास करण्याचे आव्हान
लांजा : शहरातील यश कन्स्ट्रक्शन ठेकेदारीच्या फर्मच्या आठ दिवसांपूर्वी बँक ऑफ इंडिया मधील खात्यातून रक्कम परस्पर हडप केलेल्या सायबर चोरी प्रकरणामुळे लांजा शहर व तालुक्यात खळबळ उडाली होती. 92 लाख 50 हजार एवढ्या मोठ्या रक्कमेची चोरीप्रकरणी कोणतेही धागेदोरे सापडत नसल्याने बँकांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. खातेदारांकडून बँकेतील सुरक्षिततेबाबत आणि ऑनलाईन बँकिंग सेवेबाबत भीती आणि नाराजीचा सूर उमटत आहे.
शहरातील यश कंस्ट्रक्शन या ठेकेदारी फर्मच्या बँक ऑफ इंडियामधील खात्यातून तब्बल 92 लाख 50 हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक सायबर चोरट्यांमार्फत होऊन बँकेचे सिस्टम हॅक करून 4 ऑक्टोबर रोजी परस्पर रक्कम लंपास करण्यात आली होती. फर्मचे मालक सुधीर भिंगार्डे यांना फसवणूक होण्याच्या आधी दोन वेळेस आलेल्या अनोळखी फोन कॉलला त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नसूनसुद्धा अशा प्रकारची घटना घडणे आणि बँक खात्यातून परस्पर पैसे लंपास होणे ही अतिशय गंभीर बाब मानली जात आहे.
सायबर चोरीमुळे बँकेतील खातेदारांच्या पैशांच्या सुरक्षिततेबाबत किंबहुना बँकेच्या विश्वासार्हतेबद्दल अनेक प्रश्न या घटनेमुळे जनसामान्यांसमोर उभे राहीले आहेत. त्यातच बँक ऑफ इंडियाचे स्टार टोकन अॅप हे व्यावहारिक सुरक्षिततेच्या दृष्टीने दुप्पट सुरक्षित मानले जाते. तसेच या अॅपमधून एका वेळेस 50 हजार रुपये ट्रान्सफर करण्याची व्यवस्था आहे. परंतु, लांजातील घटनेत स्टार टोकन अॅप हॅक झाल्याने एका वेळेत लाखो रुपये परस्पर लंपास होऊन त्याचा कोणत्याही प्रकारचा थांगपत्ता आठ दिवस होऊन सुद्धा लागत नसल्याने हा विषय दिवसेंदिवस जटील होत आहे.