आंबा, काजू फळपिकांच्या विम्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत
रत्नागिरी : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळबाग विमा योजना सन 2022-23 च्या आंबिया बहार करीता रत्नागिरी जिल्हयातील आंबा, काजू या फळपिकांसाठी राबविण्यात येणार आहे. शेतकर्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत विमा करावा, असे आवाहन कृषी अधीक्षकांनी केले आहे.
सन 2022-23 करिता रत्नागिरी जिल्हयासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.आंबिया बहार 2022-23 मध्ये काजू फळपिकाकरिता 1 लाख संरक्षित रक्कमेसाठी विमा हप्ता 5 हजार (प्रती हेक्टर)आहे. आंबा फळपिकाकरिता 1 लाख 40 हजार संरक्षित रक्कमेसाठी विमा हप्ता 13 हजार 300 रुपये (पर हेक्टर) असून योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2022 आहे. तसेच केळी फळपिकासाठी रु. 1 लाख 40 हजार संरक्षित रक्कमेसाठी विमा हप्ता 7 हजार रुपये (पर हेक्टर) असून योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2022 आहे.
नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना विमा सरंक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकर्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकर्यांना नाविण्यपूर्ण सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पत पुरवठयात सातत्य राखणे, उत्पादनातील जोखमीपासून सरंक्षण ही या योजनेची उद्दिष्ट आहेत.
पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित फळपिकासाठी ऐच्छिक असून, कर्जदार शेतकर्यांनी या योजनेमध्ये सहभागी न होणे या बाबत घोषणापत्र अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे बंधनकारक आहे. या योजनेत अधिसूचित क्षेत्रात अधिसुचित फळपिके घेणारे (कुळाने/भाडेपट्टीने) शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहे.