दापोली नगर पंचायतीत 5 कोटी 81 लाख रुपयांचा अपहार करणार्या लेखापालावर गुन्हा दाखल
दापोली : नगरपंचायतीत लेखापाल दीपक दिलीप सावंत याने सुमारे पाच कोटी 81 लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सावंत हा दापोली नगरपंचायतीत 2003 पासून कार्यरत आहे. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. याबाबत दापोली पोलीस ठाण्यात सिद्धेश विश्वनाथ खामकर (लेखापाल-दापोली नगरपंचायत) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी दीपक सावंत (वय 44, राहणार काळकाई कोंड, दापोली) हा लेखापाल या पदावर कार्यरत असताना अपहार करण्याच्या उद्देशाने दापोली नगरपंचायतीच्या विविध बँक खात्याची दोन कॅशबुक केली. त्यामध्ये शासनाची फसवणूक करण्याच्या हेतूने वेगवेगळा तपशील नोंदविला. अपहार लपविण्यासाठी व पुरावे नष्ट करण्याकरिता अभिलेख गहाळ करून दि. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत दापोली नगरपंचायतीच्या विविध खात्यांमध्ये शासनाकडून आलेल्या विविध निधीतून व दापोली नगरपंचायतीच्या स्वनिधी खात्यातून श्री. एंटरप्राइजेस, मंगेश पवार, शंकर माने, वरदा प्रोजेक्ट, राहुल राठोड, हुंदा इंटरप्राईजेस, नंदा इंटरप्राईजेस, शामल जाधव व सुरज कुमार या विविध खात्यांवर एकूण पाच कोटी 81 लाख दहा हजार तीनशे नऊ रुपये इतकी रक्कम वर्ग केली. याद्वारे शासनाची फसवणूक केलेली आहे. याप्रकरणी संशयित दीपक सावंत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशीद हे करीत आहे