
चार बेडकी एकत्र येवून समुद्रातील पाणी आटवू शकत नाहीत, तसेच चार लोक एकत्र येवून माझ्या गोशाळेचा कोपराही पाडू शकत नाहीत -कोकरे महाराज
चार बेडकी एकत्र येवून समुद्रातील पाणी आटवू शकत नाहीत, तसेच चार लोक एकत्र येवून माझ्या गोशाळेचा कोपराही पाडू शकत नाहीत. माझ्या गोशाळेला सरकारचा पाठिंबा आहे, असा दावा भगवान कोकरे महाराज यांनी पत्रकार परिषदेत केला.
लोटे एमआयडीसी परिसरात भगवान कोकरे महाराज यांची गोशाळा आहे. या गोशाळेचा परिसरातील नागरिकांना त्रास असल्यामुळे लोटे, धामणदेवी, सोनगाव, आवाशी घाणेखुंटच्या सरपंचांनी एमआयडीसीला निवेदन देवून गोशाळा बंद करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेवून एमआयडीसीने गोशाळा बंद करण्याची सूचना कोकरे महाराज यांना केली होती. या पार्श्वभूमीवर कोकरे महाराज यांनी पत्रकार परिषद घेवून बाजू मांडली.
कोकरे महाराज म्हणाले, वारकरी सांप्रदायाचे प्रमुख बंड्या काका कराडकर, माजी मंत्री रामदास कदम, आमदार भरत गोगावले यांची मी भेट घेतली. त्यांनी गोशाळेला पाठिंबा दर्शविला आहे. गो शाळेला कायदेशीर परवानगी देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. www.konkantoday.com