
संगमेश्वर ते पाटण घाटमार्गाचे काम सुरू करण्यासाठी सह्यांची मोहीम
संगमेश्वर : संगमेश्वर ते सातारा जिल्ह्यातील पाटण घाटमार्गाचा फायदा हा रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, पाटण या चार तालुक्यातील 100 पेक्षा अधिक गावांमधील 1.50 लाख लोकसंख्येला थेट होणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी या कामासाठी उठाव केला असून चळवळ उभी केली आहे. या चळवळीतून सह्यांची मोहीम राबवली जात आहे. सह्या मोहिमेला ग्रामस्थ आणि वाहनचालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या सर्व गावांमधील नागरिकांच्या संयुक्त सह्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना देण्यात येणार असून याविषयी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अधिक सक्षमतेने काम करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे यांनी
सांगितले.
संगमेश्वर ते पाटण या दोन भागांना जोडणार्या संगमेश्वर- पाटण घाटमार्गाचे काम व्हावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे यांनी 3 ऑगस्ट 2022 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची मुंबईत तर 27 ऑगस्ट 2022 रोजी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची कोयनानगर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी भेट घेऊन चर्चा करून निवेदन देत या कामाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. संगमेश्वर-पाटण घाटमार्ग कामासंदर्भात रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची मंत्रालयात संयुक्त बैठक ऑक्टोबरच्या दुसर्या किंवा तिसर्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाकडून देण्यात आल्याचे संतोष येडगे यांनी
सांगितले.
या घाटमार्गाच्या कामात लोकसहभाग असावा म्हणून येडगे यांनी या कामासाठी सह्यांची मोहीम निर्माण केली असून या मोहिमेला नागरिकांमधून प्रतिसाद मिळत आहे. सह्या मोहिमेसाठी एक विशेष पुस्तिका तयार केली असून या नमुना पुस्तिकेत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन आणि ज्या गावांना या घाटमार्गाचा फायदा होणार आहे त्या गावांची यादी समाविष्ठ करण्यात आली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या दाखवण्यात आली आहे. संगमेश्वर-पाटण घाटमार्ग कामाच्या सह्या मोहिमेला पुण्यातून सुरुवात केली असून या मोहिमेला संगमेश्वर, चिपळूण आणि पाटण तालुक्यातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हे काम 2024 पर्यंत पूर्ण व्हावे, हे या चळवळीचे प्रमुख लक्ष्य ठेवण्यात आले
आहे.
संगमेश्वर – पाटण घाटमार्ग कामाचे 7 मे 1999 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे आणि तत्कालीन पालकमंत्री रवींद्र माने यांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडले होते. त्या भूमिपूजनाची पाटी आजही पाचांबे नेरदवाडी या ठिकाणी उपलब्ध आहे. सध्या या कामाचा डीपीआर तयार करावा, असे निर्देश रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा हद्दीतील कामाचा डीपीआर बनवण्याचे काम सुरू आहे.
संगमेश्वर- पाटण घाटमार्ग कामासंदर्भात येडगे यांनी संगमेश्वर तालुक्यातील पुणेस्थित नागरिकांसोबत संवाद साधला असून या पुढील काळात प्रत्येक गाव पातळीवर जाऊन थेट जनतेशी संपर्क साधणार आहे. जोपर्यंत या घाटमार्गाच्या कामाला गती येणार नाही तोपर्यंत ही चळवळ अखंडपणे चालू ठेवणार असून याविषयी सातत्याने पाठपुरावा सुरुच ठेवणार असल्याची माहिती येडगे यांनी दिली आहे. सध्या संगमेश्वर परिसरातील नागरिकांना कराड, सातारा, पुणे अथवा पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी कुंभार्ली घाट किंवा आंबा घाट या दोन पर्यायी घाट रस्त्यांचा आधार घ्यावा लागतो. सध्या चिपळूण कुंभार्ली घाट मार्गे संगमेश्वर ते पाटण हे अंतर 122 कि. मी. आहे. नवीन संगमेश्वर-पाटण घाटमार्ग झाल्यास हे अंतर फक्त 46.600 कि. मी. असणार आहे तर पाचांबे नेरदवाडी या ठिकाणाहून फक्त 31 कि. मी. अंतर राहणार आहे. यापैकी दोन्ही बाजूचा 26.600 कि.मी. एकेरी रस्ता तयार असून फक्त घाटमार्गाचे 20 कि. मी. काम झाल्यास हा घाटमार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. त्यामुळे राज्य सरकारने या विषयी गांभीर्याने दखल घेऊन 2024 पर्यंत हे काम पूर्ण करावे म्हणून आपण ही चळवळ उभी केली असल्याचे येडगे यांनी यावेळी सांगितले.