राजापूरच्या स्वच्छतेला राज्यात 105 वा क्रमांक
राजापूर : शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविणार्या राजापूर नगर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2022 मध्ये राज्यातील 105 शहरांमधून पाचवा तर, देशाच्या पश्चिम विभागातील 279 शहरांमधून सहावा क्रमांक पटकाविला आहे. नगर पालिकेने मिळविलेल्या या यशाबद्दल मुख्याधिकारी प्रशांत भोसले आणि सहकारी कर्मचार्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
केंद्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये पालिकेने सहभाग घेतला होता. या अभियानामध्ये सहभागी होताना पालिकेने मुख्याधिकारी श्री. भोसले, मुख्य लिपीक जितेंद्र जाधव, आरोग्य पर्यवेक्षक श्रेया शिरवडकर आदींच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ आणि सुंदर शहर ठेवण्याचे नियोजन केले होते. बाजारपेठेतील स्वच्छता ठेवण्यासाठी अभिनव उपक्रम राबविताना सायंकाळी बाजारपेठ बंद झाल्यावर स्वच्छ करण्याला प्राधान्य देण्यात आले. केवळ कचरा गोळा न करता गोळा केलेल्या कचर्याचे योग्यपद्धतीने विल्हेवाट लावण्यालाही प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार कचर्याची ओला कचरा आणि सुका कचरा असे वर्गीकरण करीत विल्हेवाट लावली जात आहे.
केंद्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ अभियानाचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये लोकसंख्येच्या निकषानुसार करण्यात आलेल्या वर्गीकरणामध्ये राजापूर नगर पालिकेने राष्ट्रीय पातळीवर राज्यातील 105 शहरांमधून पाचवा तर, देशातील पश्चिम विभागामध्ये 279 शहरांमधून सहावा क्रमांक पटकाविला आहे. एवढेच नव्हे तर, वन स्टार रेटींग मानांकनही पालिकेने संपादीत केले आहे.