ना. सामंत यांच्या सभेने शिरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरस
रत्नागिरी : शिरगाव ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. आता उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आ. उदय सामंत यांनी यात लक्ष घातल्याने या निवडणुकीत चुरस वाढू लागली आहे. शनिवारी ना. सामंत यांनी जाहीर सभा घेऊन सहयोग पॅनलच्या उमेदवारांना आणखी प्रोत्साहीत केले आहे.
शिरगाव ग्रामपंचायत जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी जाहीर सभा घेतली. त्यामुळे उद्योगमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण सहयोग गाव विकास पॅनलच्या उमेदवारांना प्रेरणा मिळाली आहे. या ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. गेल्यावेळी ना. सामंत यांच्याच समर्थक सदस्यांचे वर्चस्व होते. आता यावेळी प्रथमच सरपंचपदाची थेट निवडणूक होत आहे. सरपंचपदासाठी माजी सरपंच साक्षी कुमठेकर, रहिमत अलीमियाँ काझी, माजी उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी, नुरीन मुकादम, सचिन सनगरे, कांचन गोताड, गणेश भरणकर, मिथिला शिंदे, सेजल चव्हाण, गणेश भरणकर, सना चिकटे, शकील मोडक हे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सरपंचपद मिळवण्यासाठी संपूर्ण सहयोग गाव विकास पॅनलकडून साक्षी कुमठेकर आणि महाविकास आघाडीकडून हरिदा रज्जाक काझी रिंगणात आहेत.