
दापोलीतील कर्दे येथे समुद्रात बुडणार्या पाच पर्यटकांना वाचवले; एक बेपत्ता
दापोली : कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कर्दे येथे पर्यटनाला आलेला पर्यटकांच्या बाबतीत दुर्घटना घडली आहे. पर्यटनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील सहापैकी एक तरूण समुद्रात बुडाला असून त्याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे. सौरभ धावडे असे त्या तरुणाचे नाव आहे. ही घटना दि. 9 रोजी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कार्तिक घाडगे (वय 20), यश घाडगे (वय 19), दिनेश चव्हाण (वय 20), अक्षय शेलार (19), कुणाल घाडगे (30, सर्व रा. एकसर ता. वाई जि. सातारा), तर सौरभ धावडे (18, रा. पाचगणी, महाबळेश्वर) असे सहा पर्यटक कर्दे येथे दुचाकीने आले होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास किनार्यावर त्यांनी तंबू उभारून आपले साहित्य त्यात ठेवले आणि ते सहाही जण पोहण्यासाठी समुद्रात गेले. यावेळी समुद्राला ओहोटी होती. याचदरम्यान पोहण्यासाठी गेलेल्या या तरुणाच्या पायाखालील वाळू निसटू लागली आणि ते समुद्रात खेचले जाऊ लागले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर हॉटेलमध्ये असलेले ओंकार नरवणकर तसेच मकरंद तोडणकर हे दोरी घेऊन मदतीसाठी तत्काळ घटनास्थळी धावले. या दोघांनीही तरुणांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात पाचजणांना वाचवण्यात त्यांना यश आले. त्यापैकी सौरभ धाडवे (18) याचा हात सुटला आणि तो समुद्रात ओढला जाऊन काही क्षणातच समुद्राच्या पाण्यात दिसेनासा झाला. सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.