लांजात 92 लाख 50 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक
लांजा : बँकेतील खात्यातून तब्बल 92 लाख 50 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार लांजा तालुक्यातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी बँकेची ‘स्टार टोकन’ ही आर्थिक व्यवहाराची यंत्रणा हॅक करून ऑनलाईन नेट बँकिंगद्वारे पैसे परस्पर काढून फसवणूक केली. लांजा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. लांजा शहरातील ठेकेदार सुधीर भिंगार्डे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. यानुसार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजात यश कन्स्ट्रक्शन या कंपनीचे अकाऊंट बँक ऑफ इंडिया लांजा शाखेत आहे. नेट बँकिंगद्वारे येथून व्यवहार व्हायचे. 7 ऑक्टोबरला बँक खात्याला जोडलेल्या सुधीर भिंगार्डे यांच्या मोबाईल नंबरवर बँक खात्यातून पैसे कमी झाल्याचे मेसेज आले. पैसे का कमी झाले म्हणून बँकेच्या स्टार टोकन सिस्टीमने तपासण्याचा प्रयत्न करण्यात आला. नेट बँकिंग करिता असलेले बँकेचे स्टार अॅप टोकन ही बँकिंग सेवा त्या दिवशी चालू नव्हती. त्यामुळे व्यवस्थापक वसंत मसणे यांनी बँक ऑफ इंडियाच्या लांजा शाखेत जाऊन याची खातरजमा केली. त्यावेळी त्यांनी बँक खात्याचा तपशील काढला असता त्यातील 92 लाख 50 हजार रुपयांची रक्कम परस्पर काढल्याच्या नोंदी दिसून आल्या. यानंतर यश कन्स्ट्रक्शनचे मालक सुधीर भिंगार्डे यांनी स्वतः बँकेत जाऊन खात्री केली. त्यांनी बँक मॅनेजर यांना आम्ही ही रक्कम काढली नसताना हे पैसे खात्यातून कमी का झाले याची पडताळणी करण्याची विनंती केली. ही पडताळणी केली असता कोणीतरी अज्ञाताने दि. 4 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान ही रक्कम फसवणूक करून परस्पर काढून घेतल्याची सायबर चोरी केल्याची खात्री झाली. तक्रारीनुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.