रत्नागिरीचा अविराज गावडे याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंडर १९ क्रिकेट संघात निवड

रत्नागिरी : रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या १४, १६ आणि १९ खालील क्रिकेट संघाचा कर्णधार राहिलेला रत्नागिरीचा सुपुत्र अविराज अनिल गावडे याची आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंडर १९ क्रिकेट संघात निवड झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रिकेट इतिहासात प्रथमच अशी संधी रत्नागिरीच्या या सुपुत्राला मिळाली आहे.

वयाच्या पाचव्या वर्षांपासून क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या अविराज याने अल्पावधीतच हे यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंडर १६ च्या लीग स्पर्धेत तब्बल ८१ विकेट मिळवून त्याने रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. यापूर्वी हे रेकॉर्ड ५६ चे होते. अविराजने ते पार करत नवनवे विक्रम स्थापित करत महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. याशिवाय विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये ऑलराऊडर कामगिरी करत अविराजने साऱ्यांची मने जिंकून घेतली, क्रिकेटमध्ये त्याने केलेल्या कामगिरीची दखल घेण्यात आली असून, त्याची भारताच्या पश्चिम विभाग क्रिकेट अंडर १६ च्या संघात निवड झाली होती.

त्यानंतर सातत्याने चांगली कामगिरी करत ‘इनव्हायटेशन’ अंडर १९ च्या लीग स्पर्धेत अविराजने २३ विकेटस घेताना ११६ धावा केल्या असून, यात नाशिकबरोबर झालेल्या सामन्यात अर्धशतक केले आहे. अविराज याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने घेत त्याची अंडर १९ च्या क्रिकेट संघात निवड केली आहे. यात राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आणि रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किरण सामंत यांच्या विशेष प्रयत्नामुळे अविराज याची संघात वर्णी लागली आहे.

या निवडीबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष बाळू साळवी, सचिव बिपीन बंदरकर व सर्व पदाधिकारी आदींनी अविराज याचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button