
गणेश आगमन मिरवणुकीमध्ये लेझर चा वापर, तरुणाच्या डोळ्याला इजा.
गणेश आगमन मिरवणुकीमध्ये अनेक मंडळांनी लेसरचा वापर केला. यामुळे चार जणांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. यामधील उचगाव, मणेर मळा (ता. करवीर) येथील आदित्य पांडुरंग बोडके या 21 वर्षीय तरुणाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे.त्याच्या उजव्या डोळ्याचा पडदा भाजला असून, रक्तवाहिन्या फुटून गुठळ्या तयार झाल्या आहेत. सध्या आदित्यला उजव्या डोळ्यांनी काहीच दिसत नाही. शास्त्रीनगर येथील खासगी रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञ त्याच्यावर उपचार करत आहेत. दरम्यान, शनिवारी एक ज्येष्ठ नागरिक नातवाला घेऊन दवाखान्यात जात होते. तेव्हा मिरवणुकीमध्ये वापरण्यात आलेल्या लेसरमुळे त्या दोघांच्या डोळ्याला इजा झाली आहे. साऊंड सिस्टीमच्या दणदणाटामुळे त्यांच्या तब्बल अर्धा तास कानठळ्या बसल्या होत्या. शुक्रवारी मिरवणूक बंदोबस्तासाठी रस्त्यावर उभारलेल्या पोलिस कर्मचारी युवराज पाटील यांच्या डोळ्यालाही लेसर किरणांमुळे गंभीर इजा झाली. संबंधित कर्मचार्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.