नदीच्या पाण्यात औषधी गोळ्या मिसळून मासेमारी; ग्रामस्थ संतप्त;मासेमारी करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार
खेड : खेड तालुक्यातील काही नद्यांच्या दोहांमध्ये विषारी औषध टाकून मासेमारी केली जात असल्याचे निदर्शनाला आल्याने परिसरातील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. ज्या डोहांमध्ये अशा प्रकारे मासेमारी केली जाते त्यातील काही डोहांवर नळपाणी योजना असल्याने नदीतील दूषित पाणी नळपाणी योजनेद्वारे ग्रामस्थांपर्यंत पोहचून अनर्थ घडण्याची शक्यता नाकाराता येत नसल्याने पाण्यात विषारी औषध मिसळून मासेमारी करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे. .
तालुक्यातील नद्यांमध्ये मासेमारी करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही गावांमध्ये नदीचे पाणी अडवून त्या पाण्यात बाबूंपासून तयार केलेला सापळा (ग्रामीण भाषेत त्याला टोका म्हणतात) लावून मासेमारी केली जाते तर काही ठिकाणी काहीजण दिवसभर नदीच्या काठावर बसून गळ टाकून मासेमारी करतात काही ठिकाणी डोहातील संपूर्ण पाणी बाहेर काढून मासेमारी केली जाते तर ज्या डोहातील पाणी पूर्णपणे बाहेर काढणे शक्य नसते त्या डोहांमध्ये औषधी गोळ्या, किंवा तिसळीच्या झाडाचा चोळलेला पाळा (ग्रामीण भाषेत त्याला माच असे म्हटले जाते ) टाकून मासेमारी केली जाते.
खेड तालुक्यातील कोंडिवली गावाच्या हद्दीतून वाहणाऱ्या नद्यांच्या डोहांमध्ये औषधी गोळ्या किंवा तिसळीच्या पाल्याचा माच टाकून मासेमारी करण्याच्या प्रकार वारंवार घडून लागले आहे. अशा प्रकारे मासेमारी करणे आरोग्याला धोकादायक असल्याने औषधी गोळ्या किंवा माच टाकून मासेमारी करू नये असे येथील ग्रामस्थांनी मासेमारी करणाऱ्यांना वारंवार बजावले आहे. मात्र तरीही मासेमारी करणारे नदीच्या डोहात विषारी औषध मिसळून मासेमारी करतच आहेत.
आज पुन्हा एकदा कोंडिवली परिसरात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन मासेमारी करणाऱ्यांना मज्जाव केला तसेच हा प्रकार कायमस्वरूपी थांबवा यासाठी पाण्यात औषध मिसळून मासेमारी करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या दोघांना पोलीस स्थानकात आणले. पोलिसांनी त्या दोघांनाही समाज देऊन सोडून दिले
ज्या डोहावाजवळ हा प्रकार घडला त्या डोहाजवळ नळपाणी योजनेची टाकी आहे. डोहातील पाणी दूषित झाल्यास टाकीतील पाणी देखील दूषित होण्याची शक्यता आहे तेच पाणी जर नळपाणी योजनेद्वारे ग्रामस्थांपर्यंत पोहचले तर ग्रामस्थांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे पोलिसांनी संबंधितांना योग्य ती समाज द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली