लांजात ट्रॅकमॅनच्या प्रसंगावधानामुळे रेल्वेचा अपघात टळला
लांजा : तालुक्यातील आडवली रेल्वे स्टेशननजीक हसोळ गावात दरड कोसळली. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक कोलमडली होती. शुक्रवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली. तीन तासांनंतर दरड बाजूला केल्यावर दुपारी 2 वाजता वाहतूक पूर्ववत झाली. या घटनेत गस्तीवरील ट्रॅकमॅनच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य अपघात टळला. मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला. रेल्वे गाड्या रत्नागिरी, विलवडे, वेरवली, निवसर, वैभववाडी स्थानकांवर थांबवण्यात आल्या. दरड कोसळल्यानंतर सावंतवाडी -दिवा ही गाडी वेरवली स्थानकावर, राजधानी एक्सप्रेस निवसर स्थानकावर थांबवण्यात आली. अन्य गाड्या रत्नागिरी, वैभववाडी येथे थांबविण्यात आल्या. आडवली स्थानकात गस्तीवर असलेल्या ट्रकमन अभय पाटोळे यांना रेल्वे रुळावर दरड आल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान साधून तातडीने आडवली स्टेशन मास्तर आणि संबंधित अधिकारी यांना कळविले. यानंतर रेल्वे यंत्रणा त्वरित घटनास्थळी दाखल झाली. सावंतवाडी ते दिवा ही ट्रेन वेरवली येथून निघणार होती. परंतु वेळीच ही गाडी थांबवण्यात आली. यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे मडगाव हप्पा, मांडवी एक्सप्रेस डाऊन, जनशताब्दी, राजधानी या गाड्या विलंबाने धावत होत्या. रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रयत्नाने रेल्वे रुळावर आलेले मोठे दगड, दरड बाजूला करण्यात आली.