
राजापूर-लांजात रेशीम उत्पादनासाठी प्रयत्न
लांजा : रेशीम व्यवसायाची उभारणी करण्याच्या उद्देशाने राजापूर आणि लांजा तालुक्यातील शेतकर्यांनी एकत्रित येत राजापूर-लांजा रेशीम शेतकरी समूह गटाची स्थापना केली आहे. या गटातील सहभागी शेतकर्यांनी तुती लागवड केली असून येत्या काही महिन्यांमध्ये प्रत्यक्ष रेशीम निर्मितीला सुरूवात होणार आहे.
कोकणामध्ये तुती लागवडीच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण प्रयोग केला जात आहे. शेतकरी समूह गटाने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुहास पंडित यांची भेट घेतली. तुती लागवडीसह रेशीम उद्योगासाठी शासकीय स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिल्याची माहिती राजापूर-लांजा रेशीम शेतकरी समूह गटाचे प्रमुख आणि माजी सैनिक वासुदेव घाग यांनी दिली.
गटविकास अधिकार्यांच्या भेटीवेळी कृषी अधिकारी परेश सुर्वे, कृषी विस्तार अधिकारी प्रभाकर आपटे, राजापूर-लांजा रेशीम शेतकरी समूह गटाचे अध्यक्ष दयानंद चौगुले, माजी सैनिक आणि शेतकरी श्री. घाग, अमर खामकर, राजाराम पाटेकर, हरिश्चंद्र पाटेकर, मनोहर पेडणेकर, सुधीर पालकर, हनुमंत विचारे आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी या शेतकर्यांनी पंडित यांना निवेदन देताना तुती लागवडीसह रेशीम उद्योगासंबंधित प्रशिक्षणाचे आयोजन करावे, शासकीय योजनेतून शेतकर्यांना लाभ वा अनुदानाद्वारे अर्थसहाय्य मिळावे, अशी मागणी केली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रोजगार वा अनुदान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.