चिपळूण – पोफळी ग्रामपंचायतीची निवडणूक सतरा वर्षानंतर बिनविरोध
चिपळूण : पोफळी ग्रामपंचायतीची निवडणूक सतरा वर्षानंतर बिनविरोध झाली आहे. शुक्रवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची मुदत असताना सरपंच पदासाठी एक, तर सदस्य पदासाठी अर्ज सादर केलेल्यांपैकी तिघांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले आहे. यावेळी सुवार आणि साळवी गटाने समझोता करून निवडणूक बिनविरोध केली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उस्मान सय्यद हे बिनविरोध झाले आहेत. खरेतर सरपंच पदासाठी निवडणूक होणार होती. जनतेतून सरपंच निवडला जाणार होता. असे असताना हे पद बिनविरोध निवडून देण्यात आले आहे. ग्रा. पं. च्या प्रभाग क्र. 1 सूचिता सुतार, तृप्ती पवार; प्रभाग क्र. 2 संजय जाधव, तमन्ना सय्यद, प्रभाग क्र. 3 संजय घाग, वैशाली सकपाळ, सुजाता घाणेकर. प्रभाग क्र. 4 संकेत सुवार, नितिका बामणे, अनुश्री पंडव. प्रभाग क्र. 5 तेजस्वी मानकर, संजय बामणे, वैभव पवार.
पोफळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काही दिवसांपासून सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. यातून 13 प्रभागासाठी 13 उमेदवार आणि सरपंचपदासाठी एक उमेदवार निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झाले होते. मात्र, प्रभाग क्रमांक तीन मधील 3 जागांसाठी 4 अर्ज दाखल झाले होते. प्रभाग क्रमांक 1 मध्ये सुजाता घाणेकर यांनी, तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनंत भैरवकर यांनी डमी अर्ज भरला होता. उमेदवारी न मिळाल्याने महादेव चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक 3 मधून अर्ज भरला होता.
सरपंच पदासाठी अनंत भैरवकर यांनी डमी उमेदवारी अर्ज सादर केला होता. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी चव्हाण यांच्यासह डमी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे पोफळी ग्रामपंचायत निवडणूक टळली आहे.