
कामथे येथील मानसी महाडिकला रौप्य पदक
चिपळूण : तालुक्यातील कामथे येथील मानसी महाडिक या विद्यार्थिनीने विभागीय कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारत जिल्ह्याला मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन कुस्तीतील पहिले रौप्यपदक मिळवून दिले. खोपोली येथे 1 ते 2 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत मानसी संजय महाडिक (कामथे-चिपळूण) हिने 53 किलो खालील वजनी गटामध्ये यशस्वी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये मानसीने अंतिम फेरीपर्यंत जोरदार मजल मारत रौप्य पदकाची कमाई केली. मानसी ही शहरातील डीबीजे महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या तिसर्या वर्षात शिक्षण घेत आहे. पुढील विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी मानसीची निवड झाली आहे. प्रशिक्षक वैभव चव्हाण यांच्याकडून ती कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. तिच्या या यशाबद्दल डीबीजे कॉलेज, रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी अभिनंदन केले.