उपजिल्हा रुग्णालयांतील डॉक्टरांचे वेतन तीन महिने रखडले
रत्नागिरी : केंद्र शासन अंतर्गत असणार्या उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टर व सुरक्षा रक्षकांचे वेतन गेले तीन महिन्यांहून अधिक काळ रखडले आहे. यामुळे येथील अधिकारी व कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. राज्य शासनाने याबाबत आवश्यक ती उपाययोजना करून कंत्राटी डॉक्टरांच्या वेतनाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी उपजिल्हा रुग्णालये आहेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून ही रुग्णालये चालवली जातात. त्यामुळे तेथील अधिकारी व कर्मचार्यांचे वेतन केंद्र शासनाच्या माध्यमातून होत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांची कमतरता भासल्याने अनेक ठिकाणी कंत्राटी पद्धतीने एमबीबीएस पूर्ण केलेेले डॉक्टर भरण्यात आले. कामथे उपजिल्हा रुग्णालयाबरोबरच जिल्ह्यातील अन्य उपजिल्हा रुग्णालयात काम करणारे कंत्राटी डॉक्टर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना गेले कित्येक महिने वेतन मिळत नसल्याने अडचण होत आहे. तरीही ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून या डॉक्टरांकडून वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहे.
राज्य शासनाने कंत्राटी पद्धतीने या डॉक्टरांची नेमणूक केली आहे. अनेक दिवस ते चांगली सेवाही देत आहेत. परंतु वेतन मिळत नसल्याने हे अधिकारी, कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक डॉक्टर परजिल्ह्यातून उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. मात्र, वेतनच मिळत नसल्याने चरितार्थ चालवायचा कसा? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे या लोकांना मोठी आर्थिक चणचण निर्माण झाली
आहे.
याच पद्धतीने रुग्णालयातील कंत्राटी सुरक्षा रक्षकांचा प्रश्नदेखील असाच आहे. त्यांना तर सहा महिने वेतन मिळालेले नाही. त्यामुळे राज्य शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी डॉक्टर व सुरक्षा रक्षकांकडून होत आहे. एकीकडे शासन राज्यात ठिकठिकाणी रुग्णालये सुरू करणार अशी घोषणा करीत आहे. मात्र, दुसरीकडे डॉक्टरांना द्यायला पैसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने हे पैसे तत्काळ द्यावेत व हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी होत आहे.