रत्नदुर्गनिवासिनी श्री भगवती देवीच्या नवरात्र उत्सवात विविध कार्यक्रम

रत्नागिरी : रत्नदुर्गनिवासिनी श्री भगवती देवीचा नवरात्रोत्सव सोहळा दिमाखात सुरू असून, राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत आहेत. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसात लाखो भाविक येतात. रविवारी सातव्या माळेला देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. रत्नागिरी शहराच्या पश्‍चिमेला 2 कि. मी. अंतरावर अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर रत्नदुर्ग किल्ल्यात श्रीदेवी भगवतीचे शिवकालीन मंदिर आहे. भगवती देवीने रत्नासूर नावाच्या असुराचा वध करून रत्नदुर्ग किल्ल्यावर वास्तव्य केले. तेव्हापासून वर्षानुवर्षे देवीचे बारा मानकरी आणि ग्रामस्थ भक्तिभावाने आणि नित्यनेमाने नवरात्रोत्सव साजरा करतात.  सन 1736 मध्ये शाहू महाराजांनी बावडेकर यांना सांगून देवीचे मंदिर बांधल़े 1940 साली दानशूर भागोजीशेठ कीर यांनी हे मंदिर पुन्हा नव्याने बांधले. या मंदिराचा गोपूर जमिनीपासून 70 फूट उंचीचा आहे. देवीचे स्वयंभू मूर्तिस्थान हे अडीच फूट उंच आहे. देवीच्या हातात शंख, चक्र आणि ढाल, तलवार आहे. देवीची मूर्ती पूर्वेकडे तोंड करून उभी आहे.
भगवतीच्या डोंगरावरून दिसणारे सौंदर्य विलोभनीय दिसते. येथील एक वैशिष्ट्य म्हणजे डोंगराच्या एका बाजूला असणार्‍या समुद्राकाठची वाळू काळी आहे तर दुसर्‍या बाजूच्या समुद्राकाठची वाळू पांढरी आहे. त्यामुळे समुद्र एकच असला तरी पांढरा समुद्र आणि काळा समुद्र अशी दोन अंगे आपल्याला भगवतीच्या डोंगरावरून पाहावयास मिळतात.
उत्सवकाळात रत्नागिरीबरोबरच मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथून भाविक दर्शनासाठी येतात. नवव्या माळेच्या दिवशी रात्री देवीचा गोंधळ असतो. गोंधळ घालून दिवट्या पाजळल्या जातात व रात्री वाजतगाजत देवीचा ‘आराबा’ बाहेर पडतो. त्यावेळी बालेकिल्ल्यावरील सात बुरूजांना रात्री 12 वाजता नारळ देऊन शांत केले जाते. रात्री 1 वाजता मिरवणूक देवळात येते. प्रत्येक मानकर्‍यास मानाचे नारळ दिले जातात. पहाटे 4 वाजता देवीची आरती होऊन गार्‍हाणे घातले जाते. सायंकाळी 7 कुमारिकांची पूजा केली जाते. देवीला कोहळ्याचा बळी दिला जातो आणि उत्सवाची समाप्ती होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button