
जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत फणसवणे, आर्यन ब संघ विजेते
रत्नागिरी : जिल्हा खो-खो असोसिएशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय किशोर-किशोरी निवड चाचणी व जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद मुलांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे आणि रत्नागिरीतील आर्यन ब संघाने पटकावले. या स्पर्धेतून निवडण्यात येणारा संघ राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.
रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर आयोजित जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत किशोर-किशोरीचे 16 संघ सहभागी झाले होते. किशोर गटामध्ये फणसवणेच्या बलांढ्य संघाने लांजा संघावर एक डाव चार गुणांनी मात केली. किशोरी गटातील सामन्यांमध्ये आर्यन अ संघाने एम. एस. नाईकचा तर आर्यन ब संघाने लांजा येथील तळवडे संघाचा पराभव करुन अंतिम फेरी गाठली. आर्यन ब संघाने आर्यन अ वर मात करत विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेतून जिल्हा संघाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी राज्य खो-खो असोसिएशनचे माजी सचिव संदिप तावडे, प्रशांत देवळेकर, प्रसाद सावंत, पंकज चवंडे, शशांक उपशेट्ये यांच्यासह जिल्हा खो-खो असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेला मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.