
चिपळूणचे शरद शिगवण शिंदे गटात; आ. भास्कर जाधवांना धक्का
चिपळूण : पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि कुणबी समाजाचे नेते शरद शिगवण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांचा शिंदे गटातील प्रवेश निश्चित झाला आहे. यामुळे हा शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांना धक्का मानण्यात येत आहे. शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात प्रमुख कार्यकर्ते मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. गुहागर मतदार संघातील युवा सेनेच्या अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता गुहागर मतदार संघात समाविष्ट असणार्या चिपळूण तालुक्यातील 72 गावातील अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक लवकरच प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. या भेटीदरम्यान शिगवण यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार असून गुहागर मतदारसंघात कुणबी समाजाची मोट बांधण्यासाठी त्यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे आता गुहागर मतदारसंघात शिंदे गट सक्रिय होताना दिसत आहे.