हिंदूंनी संघटीत होऊन आपल्या न्याय्य अधिकारांची मागणी करण्याची गरज : हिंदू जनजागृती समितीचे राज्य समन्वयक मनोज खाड्ये
रत्नागिरी : सध्या देशात हिंदू वगळता अन्य धर्मीय संघटितरित्या दबाव निर्माण करून आपल्या मागण्या शासनाकडून मान्य करून घेतात असे दिसते. मात्र, आता हिंदूंनी संघटीत होऊन आपल्या न्याय्य अधिकारांची मागणी करण्याची गरज देशात निर्माण झाल्याचे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र, गोवा, गुजरात राज्य समन्वयक मनोज खाड्ये यांनी केले.
हिंदू जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्ती निमित्त शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी हलाल जिहादविषयी कडवट टीका केली. दहशतवादाची पाळेमुळे उखडून टाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी ‘हलाल जिहाद’ ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच ‘हलाल जिहाद विरोधी कृती समिती’ची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमास पतंजली योग समितीचे रत्नागिरी जिल्हा प्रभारी अधिवक्ता विद्यानंद जोग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन समितीचे परेश गुजराथी यांनी केले. आयोजन समितीचे सुरेश शिंदे व संतोष घोरपडे यांनी केले. चिपळूण न.प.चे माजी नगरसेवक शशिकांत मोदी व खेड येथील मनसेचे विनय माळी यांनी समितीच्या कार्यातील सहभागाविषयी अनुभव कथन केले. या कार्यक्रमास कालभैरव सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष विश्वास चितळे, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार सिद्धेश लाड, गोरक्षक संदीप कदम, काडसिद्धेश्वर सांप्रदायाचे भिकाजी चाळके, विहिंपचे जिल्हा मंत्री उदय चितळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, शहर अध्यक्ष आशिष खातू, मनसे तालुकाध्यक्ष अभिनव भुरण, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अनिकेत कानिटकर, हभप गणपत मोडक आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.