
कट रचून घातपात केल्याचा पोलिसांचा संशय; कळवंडे अपघातातील जखमी झायलो चालकाला अटक
चिपळूण : कळवंडे बौद्धवाडी येथे रिक्षाला झायलो गाडीची धडक बसून महिलेचा मृत्यू व दोघेजण गंभीर जखमी झाले. या घटनेत कट करून अपघात झाला का? याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पोलिसांनी संबंधित झायलो चालकास अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आणखी 7 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कळवंडे वरपेवाडीत दोन गटात गणेशोत्सवापासून वाद सुरू आहेत. याच कालावधीत दोन दुचाकींमध्ये किरकोळ अपघात घडला होता. त्यानंतर कळवंडेतील हातभट्टी व्यवसायावरून वाद निर्माण होऊन पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी हातभट्टी व्यावसायिक सदाशिव वरपे याच्यावर धडक कारवाई केली होती. त्यातून हा वाद विकोपाला गेला आणि त्याचाच मुलगा नंदेश सदाशिव वरपे याने जाणीवपूर्वक रिक्षाला धडक दिली, असा आरोप रवींद्र वरपे याने आपल्या जबाबात केला आहे. त्यामुळे नंदेश वरपे याला अटक करण्याची मागणी करताना मृत्यू झालेल्या आशा रवींद्र वरपे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. या महिलेचा मृतदेह चोवीस तास उलटून गेले तरी कामथे येथील शवागृहात होता. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप येथील काही ग्रामस्थांनी केला असून या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. तीस तासांहून अधिक काळ मृतदेहावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत. कळवंडे वरपेवाडी येथील रवींद्र वरपे हे पत्नीसह रिक्षाने जात असताना समोरून येणार्या झायलो गाडीची रिक्षाला धडक बसली. यामध्ये रिक्षा दूरवर फेकली गेली. या घटनेत आशा वरपे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना कामथे उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, हा अपघात नसून घातपात आहे, असा आरोप करण्यात आला होता.