
भोस्ते घाटातील मृतदेह कोणाचा, गुढ अद्यापही कायम.
सावंतवाडीतील तरुणाला पडलेल्या स्वप्नामुळे खेड भोस्ते घाटातील मृतदेहाची माहिती पुढे आली; परंतु तो मृतदेह कोणाचा, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. त्या मृतदेहाच्या पॅन्टच्या खिशात मिळालेल्या टायगर माचिसवरून पोलिस थेट तामिळनाडूत पोहेचले व तेथून त्याची लिंक कोल्हापूर येथील माचिस वितरकापर्यंत आली आहे.या प्रकरणात कोल्हापुरातील बेपत्ता लोकांचीही पोलिस माहिती घेत आहेत. यातून या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिस कटाक्षाने लक्ष ठेवून आहेत.सिंधुदुर्गमधील सावंतवाडी आजगाव येथील योगेश पिंपळ आर्या याला खेड भोस्ते घाटातील डोंगरात जंगलात पुरुषाचे प्रेत असून, तो माझ्या स्वप्नात येऊन मला मदत करा, असे सांगत असल्याचे त्याने खेड पोलिसांना सांगितले. 17 सप्टेंबरला याबाबत आर्याने खेड पोलिस ठाण्यात तशी खबर दिली. त्यानंतर तपासात भोस्ते घाटात मृतदेह मिळून आला होता. हा प्रकार सर्वांनाच अचिंबत करणारा होता. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीमध्ये तरूणाने सांगितलेला घटनाक्रम आणि वस्तुस्थितीमध्ये मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आले. परंतु सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे.