
भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्वप्न साकार होणार….ना. उदय सामंत यांचे ऋण मी फेडू शकत नाही –संगीतकार मयुरेश पै.
काही गोष्टी कालातीत असतात. त्या काळाच्या मोजपट्टीत मोजता येत नाहीत. माझ्या सरस्वती भारतरत्न लतादीदींचे व्यक्तीमत्व आणि गाणं हे तसंच आहे. भारताला १९४७ साली स्वातंत्र्य आणि लतादिदींचा आवाज दोन्ही एकदमच लाभलं. लतादीदींच्या स्वराने भारतीय संस्कृती आणि विचारपरंपरा सुरेल, सुंदर झाल्या. एका संगीताच्या भाषेत गुंफल्या गेल्या.
दिदींचं सांगीतिक कार्यकर्तुत्व आपण जाणतोच. त्यांचं सामाजिक भानही विलक्षण होतं. त्यांचा दृष्टीकोन व्यापक विशाल होता. यातूनच त्यांना संगीत महाविद्यालयाची कल्पना स्फुरली. विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी भारतीय तसेच जागतिक पातळीवरच्या सर्व प्रकारच्या संगीताचं शिक्षण उत्तम प्रकारे आणि अत्यल्प दरात उपलब्ध व्हावं या इच्छेने त्यांनी संगीत महाविद्यालयाची कल्पना मला सांगितली
आज त्यांच्या वाढदिवशी ‘लता दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालया’ची मुहूर्तमेढ रोवली जात आहे याचा मला फार मोठा आनंद होतो आहे. दिदींच्या या भव्य स्वप्नाची पूर्तता करणे सोपे नव्हते. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या सांस्कृतिक जीवनातील ही घटना प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकिय पाठिंबा आणि इच्छाशक्ती आवश्यक होती.
दीदी या राजकरणाच्या पलिकड़े होत्या
पक्षांच्या पलिकड़े नाती जपणार्या होत्या.
पंडित नेहरूजीं पासुन नरेंद्र मोदीजीं पर्यंत सर्वांबरोबर जिव्हाळयाचे संबंध जपत होत्या.
दिदींनी २०१९ साली ही कल्पना तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव ठाकरे आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री मा. श्री. आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे याना बोलून दाखवली होती आणि समस्त सरकारने ती मनापासून उचलून धरली होती आणि पाउले उचलली होती. या कार्यासाठी त्या वेळचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री उदय सामंत यांनी हे आपलं वैयक्तीक कार्य आहे असं समजून सर्वतोपरी सहाय्य करणं सुरू केलं.
परंतू त्या नंतरच्या दोन वर्षात अनेक अडचणी आल्या. कोविडसारखं संकट उद्भवलं, काही राजकीय स्थित्यंतरेही घडली. परंतू दिदींची इच्छा पूर्ण करणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक कर्तव्य होतं. या कामात राजकीय घडामोडींचा दुरान्वयानेही संबंध नव्हता. महाराष्ट्र दीदींच्या स्वरांप्रमाणेच त्यांच्या उपक्रमांवरही अलोट प्रेम करतो, ते पूर्ण करण्यासाठी हिरीरीने पुढाकार घेतो याचीच ही दोन वर्षे निदर्शक आहेत.
आजच्या विद्यमान सरकारच्या कारकीर्दीत हे स्वप्न साकार होत आहे. मी व्यक्तीगतरित्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे जी उपमुख्यपंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, सांस्कृतिक मंत्री मा. श्री. सुधीर मुनगंटीवारजी, महसुल मंत्री मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील जी आणि जेजे कॉलेज ऑफ आर्टस्चे प्राचार्य मा. श्री. राजीव मिश्रा यांचे आभार मानतो.तसेच साईनाथ दुर्गे यांचे आभार मानतो.
विद्यमान सरकारचे उद्योगमंत्री मा. श्री. उदय सामंत यांचे विशेष आभार मानणं मी माझं कर्तव्य समजतो. लतादिदींशी असलेले त्यांचे स्नेहबंध, राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक कर्तव्याची जाणीव, दिलेला शब्द पूर्ण करण्याची त्यांची तळमळ यामुळे आज दिदींची संगीत महाविद्यालयाची कल्पना मूर्तरूप घेत आहे. या कामी. मा. श्री. उदय सामंतांचं फार मोठं ऋण आहे. मला ते फेडता येणं शक्य नाही. अशी ऋणं फेडायचीही नसतात…
विद्यमान उच्च व तंत्र शिक्षण प्रधान सचिव विकास रस्तोगी जी, उप सचिव सतीश तिड़के, संदेश उतेकर कक्ष अधिकारी आणि अवर सचिव हुसैन मुकदम, कला संचालक विश्वनाथ साबळे, उप संचालक विनोद दाँडगे यानीं अविरत मेहनत करुन सर्व कामे तातडीने पार पाडली.
आज त्या माझ्या देवी बद्दल त्या अलौकिक स्वराबद्दल त्या आभाळमाये बद्दल लिहिताना भावना दाटून येतात. सुधीर मोघ्यांच्या शब्दांत थोडे बदल करून त्या व्यक्त करतो…
तुच दिलेली मंजूळ गाणी डोळ्यामधले निर्मळ पाणी
तुझ्या पूजना माझ्यापाशी याविण दुसरे नाही.