चिपळूण- कोकरे गटातील शिवसैनिक राष्ट्रवादीत
तालुक्यातील कोकरे जिल्हा परिषद गटातील डेरवण, नांदगाव येथील शेकडो प्रमुख शिवसैनिकांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. आ. शेखर निकम यांनी या सार्यांचे स्वागत केले. आ. शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर आणि करीत असलेल्या राजकारण विरहित विकासकामाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. आ. शेखर निकम यांच्यासह अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सावर्डे येथील कार्यालयात हा कार्यक्रम करण्यात आला. डेरवण येथील शिवसेना शाखाप्रमुख राजेश मुंढेकर, ग्रा. पं. सदस्य नीलेश गुरव, केदारछाया मित्र मंडळ अध्यक्ष जगदीश कदम यांच्यासह सुमारे सत्तर प्रमुख शिवसैनिक तर नांदगाव येथील गणपत ठोबरे, शंकर ठोबरे, सोमा गावडे आदींसह अनेकांनी तर तालुक्यातील पिंपळी येथील शिवसेनेचे माजी सरपंच संजय आंबूर्ले यांच्यासह अनेक शिवसैनकांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यावेळी आ. निकम म्हणाले की, मला तुमचा अभिमान आहे. अनेक आमिषे दाखवण्यात आली. मात्र, आपण ती न स्वीकारता केवळ आणि केवळ विकासाला प्राधान्य देत कोणत्याही दबावाला न झुकता प्रवेश केला आहे, अशा शब्दांत प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांचे आ. निकम यांनी कौतुक केले. माझ्या इथे नवा जुना काही नाही. जुना नवा भेदभाव नसणारा हा पक्ष असून तुमच्या सर्वांचा मानसन्मान ठेवला जाईल, असा विश्वास आ. शेखर निकम यांनी दिला. यावेळी येथील प्रमुख नीलेश गुरव आणि शिवसेना शाखाप्रमुख राजेश मुंढेकर यांनी सांगितले की, आम्हाला कोणताही गट नको. आम्ही प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ते आहोत. आमची यापुढे तुम्हाला खंबीर साथ राहील, असा शब्द यावेळी देताच जोरदार टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला. यावेळी माजी पं. स. सदस्य प्रकाश कानसे, संजय कदम, दत्ताराम गुजर, नागेश साळवी, सुधीर राजेशिर्के, दिलीप बामणे, अनिल चव्हाण, नीलेश खापरे आदींसह मोठ्या संख्येने यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.