
कामथे उपजिल्हा रुग्णालयावर काँग्रेसची धडक
चिपळूण : कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराबाबत काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष भरत लब्धे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने धडक देत रुग्णालयाच्या गैरकारभाराचा समाचार घेतला. चांगल्या प्रकारे सेवा द्या, काही अडचणी असतील तर सांगा. आम्ही सहकार्य करू, असा शब्द शिष्टमंडळाच्यावतीने भरत लब्धे यांनी दिला.
यावेळी ज्येष्ठ नेते इब्राहिम दलवाई, ओबीसी संघटक अजित कासार, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, क्षेत्राध्यक्ष महादेव चव्हाण, अशोक भुस्कुटे, यश पिसे, काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, रविना गुजर, सफा गोटे, अश्विनी भुस्कुटे, स्वाती कदम आदी उपस्थित होते.
रुग्णालय आणि परिसरातील अस्वच्छता, उपचाराबाबत होणारी चालढकल, सोनोग्राफी मशीन बंद असणे, बेडवर अंथरण्यात येणार्या खराब बेडशीट, अॅम्बुलन्सबाबतील तक्रारी, वेळेवर अॅम्बुलन्सचालक उपलब्ध नसणे, औषधांची उपलब्धता, उपहारगृहातून रुग्णांना देण्यात येणारा पदार्थांचा दर्जा, रुग्णालयातील रिक्तपदे भरणे आदी अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली गेली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. असीम नरवाडे, वैद्यकीय अधिकारी कांचन मदार यांनी शिष्टमंडळाच्या प्रश्नांना उत्तरे देताना रुग्णालयात देण्यात येणार्या रुग्णसेवा व असणार्या त्रुटींची माहिती दिली. यावेळी भरत लब्धे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले यांच्याशी संपर्क साधला. त्यांना येथील माहिती देताना रिक्तपदे – 7 स्टाफ नर्स, कायम स्वरूपी भूलतज्ज्ञ, अॅम्बुलन्स ड्रायव्हर ही पदे भरण्याबाबत कार्यवाही करावी तसेच या रुग्णालयाने 21 जून च्या पत्राने आपणाकडे सोनोग्राफी सेंटर परवाना नूतनीकरणाविषयी विनंती केली आहे. याला मंजुरी देताना शासनाकडे आधुनिक सोनोग्राफी मशीनची मागणी करावी. यासाठी ना. उदय सामंत यांची भेट घेऊ, असे सांगितले.