
रत्नागिरी मारुती मंदिर परिसरातील बंगला फोडून लाखोंचा ऐवज लांबवला
रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर भागातील बंद बंगला फोडून चोरट्याने लाखो रुपयांचा ऐवज लांबवला. संबंधित घरमालक परत आल्यानंतर चोरीची घटना उघड झाली. चोरी करणारा चोरटा सीसीटिव्हीत कैद झाल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवली आहेत. याबाबत घर मालक शशांक श्रीकृष्ण गांधी (वय 68,रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
२१ सप्टेंबर रोजी घडलेली चोरीची ही घटना सोमवारी उघडकीस आली आहे. घरमालक आपले घर बंद करून बाहेर गेले होते. सोमवारी पुन्हा घरी आल्यावर त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. तत्काळ त्यांनी पोलिसांना कळवले.
आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दिनांक २१ च्या पहाटे ३ च्या सुमारास एक व्यक्ती बंगल्यात शिरताना दिसत असून ही व्यक्ती तब्बल दोन तासानंतर बाहेर आल्याचे दिसत आहे. मारुती मंदिर येथील गांधी यांचा हा बंगला आहे. बंगला फोडून रोख रक्कम आणि चांदीच्या वस्तू असा एकूण 3 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
भर वस्तीत झालेल्या या चोरीने खळबळ उडाली आहे. २१ रोजी घडलेली ही घटना २६ तारखेला समोर आली आहे. या घटनेबाबत पोलीस आता अधिक तपास करीत आहेत.